श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:04 IST
1 / 8गुंतवणुकीचा मूलभूत नियम : वयानुसार गुंतवणुकीचा फोकस बदलतो. कमी वयात तुम्ही जास्त जोखीम घेऊन आक्रमक गुंतवणूक करू शकता, तर वय वाढल्यानंतर सुरक्षितता आणि स्थिरतेवर भर देणे गरजेचे असते. त्यामुळे वयाचा प्रत्येक टप्पा ओळखून आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा एसआयपीमध्ये वळवणे हिताचे ठरते.2 / 8२५ ते ३० वर्षे (आक्रमक गुंतवणूक) : हे वय गुंतवणुकीसाठी 'सुवर्णकाळ' मानले जाते. कारण, जबाबदाऱ्या कमी आणि वेळ जास्त असतो. या वयात आपल्या उत्पन्नाच्या ३०% ते ३५% रक्कम एसआयपीमध्ये गुंतवावी. दीर्घकालीन उद्दिष्टे ठेवून इक्विटी म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करून देऊ शकते.3 / 8३१ ते ३५ वर्षे (संतुलित नियोजन) : या वयात लग्न, घर किंवा करिअरमधील बदलांमुळे आर्थिक नियोजनाला महत्त्व येते. तज्ज्ञांच्या मते, या टप्प्यावर आपल्या उत्पन्नाच्या २५% ते ३०% हिस्सा गुंतवणुकीसाठी राखून ठेवावा. वाढत्या गरजा आणि भविष्य यांचा समतोल साधत गुंतवणूक सुरू ठेवणे येथे महत्त्वाचे असते.4 / 8३६ ते ४० वर्षे (जबाबदाऱ्यांचा काळ) : मुलांचे शिक्षण, घराचा ईएमआय आणि इतर कौटुंबिक गरजा या वयात शिगेला पोहोचतात. अशा वेळी एसआयपीचे प्रमाण उत्पन्नाच्या २०% ते २५% ठेवणे योग्य मानले जाते. या काळात गुंतवणूक बंद न करता पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे.5 / 8४१ ते ४५ वर्षे (सुरक्षिततेवर भर) : या वयानंतर जोखीम घेण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते, त्यामुळे गुंतवणुकीत स्थिरता आणणे गरजेचे असते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, एसआयपीचे प्रमाण १५% ते २०% दरम्यान ठेवावे. तसेच आरोग्य विमा आणि भविष्यातील आपत्कालीन निधीला या काळात प्राधान्य द्यावे.6 / 8४६ ते ५० वर्षे (निवृत्तीचे नियोजन) : निवृत्तीचा काळ जवळ येत असल्याने गुंतवणुकीतील जोखीम कमी करणे आवश्यक असते. या टप्प्यावर एसआयपीचे प्रमाण उत्पन्नाच्या १०% ते १५% पर्यंत खाली आणावे. सुरक्षित फंडांकडे आपला मोर्चा वळवून निवृत्तीनंतरच्या निधीची आखणी अधिक काटेकोरपणे करावी.7 / 8५१ ते ६० वर्षे (स्थिर उत्पन्नाचे ध्येय) : या वयात एसआयपी केवळ ५% ते १०% पर्यंत मर्यादित ठेवावी. आता गुंतवणूक वाढवण्यापेक्षा जमा झालेला निधी सुरक्षित ठेवणे आणि एसडब्ल्यूपी सारख्या पर्यायांतून नियमित उत्पन्न मिळवण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते.8 / 8शिस्तबद्ध गुंतवणुकीचा फायदा : वयानुसार टक्केवारी बदलली तरी गुंतवणुकीतले 'सातत्य' सर्वात महत्त्वाचे आहे. शेअर बाजारातील चढ-उतारांकडे दुर्लक्ष करून वरील फॉर्म्युल्यानुसार केलेली शिस्तबद्ध एसआयपी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावते.