Youtube साठी शिक्षण सोडलं, आईनं घराबाहेर काढलं; आज आहे जगातील मोठा युट्युबर, कोट्यवधी डॉलर्सची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 09:09 IST
1 / 8युट्युबच्या माध्यमातून अनेकांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. अनेकांना युट्युबच्या माध्यमातून ओळखही मिळालीये. अनेक युट्युबर्स केवळ आज आपल्याच देशात नाही, तर अन्य देशांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत. जगातील सर्वात मोठा यूट्यूबर जिमी डोनाल्डसनच्या (Jimmy Donaldson) सबस्क्रायबर्सची संख्या २० कोटींवर पोहोचली आहे. त्याच्या आधी केवळ एका यूट्यूब चॅनलनं ही कामगिरी केली होती. T-Series च्या युट्युब चॅनेलच्या सबस्क्रायबर्सची संख्या भारतात २५.१ कोटी आहे.2 / 8ऑनलाइन जगतात जिमी डोनाल्डसन याला MrBeast म्हणून ओळखले जाते. वयाच्या १२ व्या वर्षी त्यानं YouTube द्वारे करिअरला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्याला खूप संघर्ष करावा लागला पण आज त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ८,७४,४३,५२,७५० रुपये आहे.3 / 8YouTube वरून त्याचं वार्षिक उत्पन्न २.६ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त आहे. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील जाहिरातींद्वारे पैसे कमावतो. तो त्याच्या मुख्य YouTube चॅनेलसाठी १० लाख डॉलर्सचे स्पॉन्सरशिप फी आकारतो. तसंच, तो मर्चंडाईजच्या माध्यमातून दरमहा सुमारे २.५ दशलक्ष डॉलर्स कमावतो.4 / 8२५ वर्षीय डोनाल्डसन हा अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या ग्रीनविले शहरात वास्तव्यास आहे. वयाच्या १२ व्या वर्षापासून तो यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करत होता पण त्याला यश मिळत नव्हतं. २०१६ मध्ये त्यानं शाळा सोडली आणि मीडियाचं सर्वात मोठं कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला. यूट्युबवर व्हिडिओ कसा व्हायरल होतो हे एक कोडंच होतं.5 / 8त्यावेळी त्याचं वय १६ वर्षे होते. सुमारे पाच वर्षांपासून तो यूट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत होता, पण त्याला यश मिळत नव्हतं. YouTube चं अल्गोरिदम अनलॉक करण्याच्या अगदी जवळ आहे असं त्याला वाटलं. यानंतर त्यानं त्याच्या काही मित्रांसह हा कोड क्रॅक करण्याचा प्रयत्न केला.6 / 8'मी नेहमी YouTube चा विचार करत होतो, व्हिडीओ आणि फिल्म मेकिंगचा विचार करत होतो. हा माझा रोजचा दिनक्रम होता, असं डोनल्डसन म्हणाला. त्यानं शाळा सोडली तेव्हा त्याची आई खूप निराश झाली होती. आईने डोनाल्डसनला घरातून बाहेरही काढलं होतं. पण डोनाल्डसनला त्यानं घेतलेल्या निर्णयाचं फळ मिळालं. 7 / 8२०१७ मध्ये त्याच्या पहिल्या व्हायरल व्हिडीओमध्ये, त्याने त्याच्या खोलीत खुर्चीवर बसताना १००,००० मोजले. यासाठी त्याला ४० तास लागले. त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागल्यानं त्याला जाहिरातीही मिळू लागल्या. ही कमाई त्यानं व्हिडीओ बनवण्यात खर्च केली आणि त्याला यश मिळत गेलं. 8 / 8आज त्याच्या युट्युब फॉलोअर्सची संख्या २० कोटींच्या वर गेली आहे. जुलैपर्यंत त्याचे टिकटॉकवर ८.५ कोटी इन्स्टाग्रामवर ३.९ कोटी फॉलोअर्स आहेत. मेटाचं नवं अॅप Threads वर १० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार करणारा तो पहिला व्यक्ती होता. मार्क झुकेरबर्गच्या आधी त्यानं हा पल्ला गाठला. यानंतर त्यानं रँडम पद्धतीनं एका फॉलोअरची निवड करून त्याला टेस्ला कार गिफ्ट केली होती.