KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
By जयदीप दाभोळकर | Updated: October 24, 2025 08:53 IST
1 / 7KVP Investment Scheme: हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. शेअर बाजारात जरी नफा अधिक मिळत असला तर जोखीम तितकीच अधिक आहे. त्यामुळे अनेक जण आजही पारंपारिक गुंतवणूकीला प्राधान्य देतात. जर तुम्हाला तुमची मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी आणि हळूहळू दुप्पट व्हावी असं वाटत असेल, तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra - KVP) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही सरकारच्या हमीसह येणारी योजना आहे, म्हणजेच यात गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो.2 / 7किसान विकास पत्र ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक फिक्स्ड इनकम स्कीम आहे. यामध्ये तुम्ही एका निश्चित कालावधीसाठी पैसे गुंतवता आणि मुदत पूर्ण झाल्यावर तुमची रक्कम दुप्पट होऊन परत मिळते. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते.3 / 7सध्या यात वार्षिक ७.५% (वार्षिक चक्रवाढ व्याज) व्याजदर देण्यात येतो. या दरानुसार, तुमचा पैसा ११५ महिन्यांत म्हणजेच सुमारे ९ वर्षे ७ महिन्यांत दुप्पट होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही केव्हीपी योजनेत १ लाख रुपये गुंतवले, तर ९ वर्षे ७ महिन्यांनंतर त्याचे २ लाख रुपये होतील.4 / 7या योजनेत किमान गुंतवणूक १,००० रुपये आहे आणि कमाल गुंतवणुकीला कोणतीही सीमा नाही. गुंतवणूक सिंगल किंवा जॉईंट अकाउंटमध्ये केली जाऊ शकते. तसंच, पालक अल्पवयीन मुलाच्या नावानंदेखील खातं उघडू शकतात.5 / 7या योजनेत १००% सरकारी हमी असल्याने पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो. याव्यतिरिक्त, कर्जाची सुविधा उपलब्ध आहे, म्हणजेच KVP च्या विरोधात कर्ज घेतलं जाऊ शकतं. याशिवाय खातं कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे आणि नॉमिनेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे.6 / 7यात पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. ही एक दीर्घकालीन योजना असली तरी, अडीच वर्षे (२ वर्षे ६ महिने) पूर्ण झाल्यानंतर काही अटींसह पैसे काढले जाऊ शकतात. लक्षात ठेवा की KVP वर मिळणारं व्याज करपात्र (Taxable) असतं, म्हणजेच त्यावर इन्कम टॅक्स नियमांनुसार कर भरावा लागतो. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तुमचं कर नियोजन नक्की तपासा.7 / 7एकंदरीत, जोखीम टाळून हमीपूर्वक परतावा हवा असलेल्या लोकांसाठी किसान विकास पत्र हा एक चांगला पर्याय आहे. फक्त एकदा गुंतवणूक करुन सरकारी हमीसह पुढील ११५ महिन्यांत तुम्ही तुमचा पैसा दुप्पट करू शकता.