शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील तिसऱ्या श्रीमंत व्यक्तीचा शाही विवाह! २० कोटींची अंगठी, कोट्यवधींची यॉट; अंबानींच्या लग्नालाही टाकणार मागे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:06 IST

1 / 11
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा अवघ्या जगाने पाहिला, त्यांच्या लग्नाची अजूनही चर्चा सुरू आहे. आता असाच आणखी एक विवाह पुन्हा चर्चेत आला आहे, ज्यामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च होणार आहे. हा विवाह सोहळा आहे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि त्यांची वाग्दत्त वधू लॉरेन सांचेझ (Lauren Sánchez) यांचा.
2 / 11
व्हेनिसमध्ये या भव्य लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. २० कोटी रुपयांच्या साखरपुड्याच्या अंगठीपासून ते कोट्यवधी रुपयांच्या 'कोरू' सुपरयॉटपर्यंत, हे लग्न प्रत्येक अर्थाने शाही असेल. हे लग्न २६ जून २०२५ रोजी इटलीतील व्हेनिसमध्ये एका खाजगी बेटावर होणार आहे.
3 / 11
या सोहळ्यात सुमारे २०० हाय-प्रोफाइल पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. जेफ बेझोस यांची ५० कोटी डॉलर्स किमतीची सुपरयॉट 'कोरू' ६ दिवसांच्या लग्नादरम्यान बेटावर राहणार आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिकांमध्ये काही वाद निर्माण झाला असून, व्हेनिसमधील रहिवाशांनी गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
4 / 11
पाहुण्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्य, ओप्रा विन्फ्रे, किम कार्दशियन यांसारखे अनेक सेलिब्रिटी असतील असे मानले जात आहे. पाहुण्यांना 'द अमन व्हेनिस' आणि 'हॉटेल सिप्रियानी' यांसारख्या ५ आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याची सोय केली जाईल, ज्यात एका रात्रीचे भाडे सुमारे २ लाख रुपये आहे. पाहुण्यांसाठी बेझोसने खाजगी व्हेनिस वॉटर टॅक्सींचा ताफा बुक केला आहे, ज्यात जॉर्ज क्लूनीने वापरलेली 'अमोर' टॅक्सी देखील आहे.
5 / 11
लॉरेन सांचेझ ही एक प्रसिद्ध अमेरिकन मीडिया व्यक्तिमत्व, न्यूज अँकर आणि निर्माती आहे. ती 'ब्लॅक ऑप्स एव्हिएशन' या हवाई चित्रीकरण कंपनीची संस्थापक देखील आहे. बेझोस आणि सांचेझ यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते अशी अफवा होती, पण बेझोस यांनी ते नाकारले होते.
6 / 11
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, जेफ बेझोस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती २३० अब्ज डॉलर्स (सुमारे १९ लाख कोटी रुपये) आहे. त्यांच्या संपत्तीचा मुख्य स्रोत अमेझॉनचे शेअर्स आहेत, ज्यात गेल्या वर्षी ४०% पेक्षा जास्त वाढ झाली. २०२४ मध्ये त्यांनी १३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले.
7 / 11
अमेझॉनचे सीईओ असताना बेझोस फक्त ८०,००० डॉलर्स (सुमारे ६७ लाख रुपये) वार्षिक पगार घेत होते. पण त्यांच्या कमाईचे खरे रहस्य अमेझॉनचे शेअर्स आहेत, ज्यात त्यांचे १०.८% मालकी हक्क आहे. १९९४ मध्ये सुरू झालेली अमेझॉन आज जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग कंपनी आहे.
8 / 11
बेझोस यांनी २०२१ मध्ये सीईओ पदाचा राजीनामा दिला, पण ते अजूनही कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांचा 'ब्लू ओरिजिन' हा ड्रिम प्रोजक्ट २००४ मध्ये स्थापन झाला, जो अंतराळ संशोधन करतो. २०१३ मध्ये त्यांनी 'द वॉशिंग्टन पोस्ट' विकत घेतले, जे आता डिजिटल युगात यशस्वी आहे.
9 / 11
पर्यावरण संरक्षणासाठी बेझोसने 'बेझोस अर्थ फंड'मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यांनी 'मॅगम'ला ८.४५ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. याशिवाय, त्यांनी इतर अनेक स्टार्टअप्समध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.
10 / 11
बेझोस आणि त्यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला. या घटस्फोटासाठी बेझोसने मॅकेन्झीला ३८ अब्ज डॉलर्स किमतीचे अमेझॉन शेअर्स दिले होते. बेझोस त्यांच्या परोपकारी कार्यासाठी देखील जगभरात ओळखले जातात.
11 / 11
व्हेनिसमधील स्थानिकांनी या भव्य लग्नाविरोधात 'बेझोसला नकार द्या' अशी मोहीम सुरू केली आहे. 'सॅन जॉर्जियो बॅसिलिका' येथे निषेधाचे बॅनरही लावण्यात आले आहेत. असे असले तरी, व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुग्नारो या विरोधात नाहीत असे म्हटले जात आहे.
टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीamazonअ‍ॅमेझॉनItalyइटलीmarriageलग्न