शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Share Market : शेअर बाजारात हाहाकार, ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी 'स्वाहा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 9:50 PM

1 / 9
शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. आणखी घसरण होईल की या स्तरावरून रिकव्हरी सुरू होईल, अशा प्रश्नांची उत्तरे गुंतवणूकदार शोधत आहेत.
2 / 9
गेल्या ५ सत्रात बीएसई सेन्सेक्स जवळपास ३,८२० अंकांनी घसरला. या ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे १९.३३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ सोमवारीच गुंतवणूकदारांना ९.१५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.
3 / 9
इकॉनॉमिक टाइम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अमेरिकन टेक स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर भारतातील टेक स्टॉक्सलाही फटका बसला.BSE सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य २६०.५० लाख कोटी रुपयांवर आले आहे.
4 / 9
सोमवारी शेअर बाजारात तीन हजारांहून अधिक शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तसेच ८०० हून अधिक कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट लागले. इकॉनॉमिक टाईम्समधील एका अहवालात म्हटले आहे की, सोमवारी बाजारातील आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की दर ६ पैकी ५ शेअर्स घसरले. तसेच, प्रत्येक ४ पैकी एका शेअरमध्ये लोअर सर्किट लागलं.
5 / 9
विश्लेषकांचे म्हणण्यामुसार रशिया-युक्रेन सीमेवर वाढता तणाव, चलनवाढीमुळे बाजारावर दबाव आला आहे. या घसरणीत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (एफपीआय) मोठा हात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
6 / 9
फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स सतत बाजारातून पैसे काढत आहेत. रिअल इस्टेट, निफ्टी स्मॉलकॅप, मिडकॅप यांसारख्या निर्देशांकांमध्ये ब्रेकडाउन स्पष्टपणे दिसून येत आहे, त्यामुळे बाजारातील घसरण सध्या कायम राहू शकते असं तज्ज्ञांच म्हणणं आहे.
7 / 9
GCL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांच्या मते, “परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजारातून पैसे काढून घेतल्याने बाजारात घसरण दिसून येत आहे. आकड्यांवर नजर टाकल्यास, गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये FII ने ११ हजार कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत,' असं मत GCL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल यांनी व्यक्त केलं.
8 / 9
भारतीय शेअर बाजारातील ही घसरण १-२ सत्रांपर्यंत कायम राहू शकते, असं त्यांना वाटत आहे. कारण मोठ्या प्रमाणात क्वालिटी स्टॉक्सनं चार्ट पॅटर्नवर ब्रेकडाऊन दिला आहे. याशिवाय अनेक गोष्टी २०२२ च्या अर्थसंकल्पावरही अवलंबून असतील, असंही ते म्हणाले.
9 / 9
“कोरोनाचा नवा व्हेरिअंट आणि संबंधित अनिश्चितता यामुळे जगभरातील बाजारपेठा आणि अर्थव्यवस्था दबावाखाली आहेत. सध्याच्या बाजारातील अस्थिरतेत अर्थसंकल्प काहीसा आत्मविश्वास आणि स्थिरता आणू शकेल असा आमचा विश्वास आहे,' असं मत अॅक्सिस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बी गोपकुमार यांनी व्यक्त केलं.
टॅग्स :share marketशेअर बाजारMONEYपैसाInvestmentगुंतवणूक