Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
By जयदीप दाभोळकर | Updated: August 25, 2025 09:08 IST
1 / 8Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध बचत योजनांवर उत्तम व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, किसान विकास पत्र यासह अनेक प्रकारची खाती उघडता येतात. आज आपण पोस्ट ऑफिसच्या एमआयएस म्हणजेच मासिक उत्पन्न योजनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.2 / 8गुंतवणुकीबरोबरच नियमित उत्पन्न हवं असेल तर अशा वेळी पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (Monthly Income Scheme) म्हणजेच एमआयएस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. एकरकमी गुंतवणुकीनंतर लगेचच पुढील महिन्यापासून तुमची व्याजाद्वारे कमाई सुरू होते.3 / 8पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली माहिती पाहिली तर या योजनेत सरकारकडून ७.४ टक्के दरानं व्याज दिलं जातं. एमआयएसमध्ये तुम्हाला खातं उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर व्याजाचा लाभ मिळण्यास सुरुवात होते, म्हणजेच गुंतवणुकीच्या पुढील महिन्यापासून नियमित उत्पन्नाची हमी दिली जाते. यामध्ये जमा रकमेवर मिळणारं व्याज दरमहा दिलं जातं.4 / 8पोस्ट ऑफिस एमआयएसमध्ये तुम्ही फक्त १,००० रुपयांच्या गुंतवणुकीने खाते उघडू शकता. यामध्ये पहिले सिंगल आणि दुसरे जॉइंट अकाऊंट अशा दोन प्रकारे खातं उघडता येतं. जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या मर्यादेबद्दल बोलायचं झालं तर एक खातेदार या योजनेत जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो, तर संयुक्त खातं उघडल्यावर जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो.5 / 8मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.6 / 8आता एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या योजनेतून दरमहा ५००० रुपयांपेक्षा जास्त कमाई कशी करू शकता याबद्दल सांगायचं झालं तर त्यासाठी पोस्ट ऑफिस एमआयएस कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागेल. जर तुम्ही यात ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ७.४ टक्के व्याजानं तुम्हाला दरमहा ३,०८३ रुपये व्याज उत्पन्न मिळेल, तर ९ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा जास्तीत जास्त व्याज उत्पन्न ५५५० रुपये असेल. या योजनेत लॉक-इन पीरिअड ५ वर्षांचा आहे.7 / 8जर तुम्ही जॉइंट अकाउंट उघडून नियमानुसार एकरकमी १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ७.४ टक्के दरानं दरमहा ९,२५० रुपयांचं उत्पन्न मिळेल. जर गुंतवणूकदाराचा मृत्यू ५ वर्षांच्या मुदतपूर्तीपूर्वी झाला तर खातं बंद केलं जातं आणि अनामत रक्कम नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना परत केली जाते. स्कीम बंद झाल्यानंतर शेवटच्या महिन्यापर्यंत व्याज दिलं जातं.8 / 8जर तुम्हाला या पोस्ट ऑफिस योजनेच्या मॅच्युरिटीपूर्वी तुमचं खातं बंद करायचं असेल तर गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही हे काम करू शकाल. खातं उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी बंद केल्यास गुंतवणुकीच्या रकमेतून २ टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल. खातं उघडल्याच्या तारखेपासून ३ वर्षांनंतर आणि ५ वर्षापूर्वी बंद केल्यास मुद्दलातून १ टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.