शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:44 IST

1 / 9
ते वर्ष होते २००६, जेव्हा गो इंडिगोची सुरुवात झाली होती. एअरलाईन क्षेत्रात मोठी आव्हाने होती, त्याच काळात जेट एअरवेज, एअर इंडियासारख्या तगड्या गड्यांना आव्हान देत इंडिगोचे पहिल्या विमानाने आकाशात भरारी घेतली होती. आज याच कंपनीने भारताच्या आकाशावर राज्य स्थापन केले आहे. परंतू, ज्या व्यक्तीने आपली स्वत:ची पावर वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिली होती, तोच व्यक्ती एका वादामुळे इंडिगोसोबत राहिलेला नाही.
2 / 9
इंडिगोबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात, अमूक-तमूक राजकारण्यांचा पैसा वगैरे वगैरे. काही अंशी खऱ्यादेखील असतील. परंतू, आज याच एअरलाईनने सामान्यांना विमानप्रवास दाखविला आहे. आज आपण या इंडिगोच्या यशाबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात...
3 / 9
इंडिगो या एअरलाईनची स्थापना राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल या दोन संस्थापकांनी केली होती. कोणताही तामझाम नाही, विमाने भाड्याने घेतली, कमी तिकीट दर आणि एकाच प्रकारची विमाने ताफ्यात ठेवत आज देशाच्या ६४ टक्के एव्हिएशन बिझनेसवर राज्य मिळविले आहे.
4 / 9
कमी भाडे, वेळेवर सेवा ही इंडिगोची पहिली खासियत आहे. सध्याच्या काळात कंपनीने वेळेला तिलांजली दिली असली तरी कमी भाड्यात कंपनी विमान प्रवास घडवत आहे. यामुळे ती प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली आहे.
5 / 9
इंडिगो केवळ एकाच प्रकारच्या विमानाचा वापर करते. ती म्हणजे एअरबस कंपनीची A320. यामुळे झाले असे की कंपनीला स्पेअरपार्टसाठी जास्त काम करावे लागले नाही, एकाच प्रकारची विमाने असल्याने मेकॅनिक आणि दुरुस्ती तसेच अन्य गोष्टी देखील सोप्या झाल्या होत्या. यामागे एका व्यक्तीचे डोके होते. ते म्हणजे राकेश गंगवाल.
6 / 9
खरेतर या कंपनीची स्थापना २००४ लाच झाली होती. परंतू, त्यांच्याकडे विमाने नव्हती. गंगवाल हे अमेरिकेतील स्थायीक, त्यांना विविध एअरलाईनमध्ये वरिष्ठ पदांवर काम करण्याचा अनुभव होता. ओळखी होत्या. या गंगवाल यांनीच आपली ताकद लावून एअरबसकडून उधारीवर १०० विमाने मिळवून दिली होती.
7 / 9
परंतू, इंडिगो आता एक वेगळाच फॉर्म्युला वापरत आहे. बल्कमध्ये विमाने खरेदी करायची आणि ती भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना विकायची. नंतर हीच विमाने परत त्यांच्याकडूनच भाड्याने घ्यायची. यामुळे कंपनीकडे गंगाजळी उरते आणि विमाने देखील नवीन राहतात.
8 / 9
सुरुवातीची १५ वर्षे सारेकाही चांगले सुरु होते. या कंपनीचे दोन मालक असल्याने २०२० मध्ये वाद सुरु झाले. गंगवाल यांनी कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये बदल करण्याची मागणी केली होती, परंतू ती न झाल्याने २०२२ मध्ये त्यांनी राजीनामा दिला व कंपनी सोडली.
9 / 9
इंडिगोमध्ये गंगवाल कुटुंबाचा ३६ टक्के हिस्सा होता, त्यांनी मोठा भाग विकला आहे. आज गंगवाल यांच्याकडे इंडिगोची ५ टक्केच हिस्सेदारी राहिली आहे.
टॅग्स :Indigoइंडिगो