Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 10:29 IST
1 / 8Income Tax Rules : आपल्या देशात बालमजुरी बेकायदेशीर मानली गेली आहे, पण आजच्या काळात अशी अनेक माध्यमं आहेत ज्याद्वारे मुलंही भरपूर पैसा कमावतात. टीव्हीवरील सर्व टॅलेंट शोपासून ते यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मपर्यंत मुलं भरपूर पैसे कमवत आहेत. 2 / 8पण या मुलांच्या कमाईवर इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कोणत्याही प्रकारचे टॅक्स लायबिलिटी असेल तर त्याची भरपाई मुलांना करावी लागते की त्यांच्या आई-वडिलांना करावी लागते? याविषयी आयकर विभागाचे नियम काय म्हणतात ते आपण जाणून घेऊ.3 / 8अल्पवयीन मुलांच्या उत्पन्न दोन प्रकारचे असू शकतात. पहिला म्हणजे कमावलेलं उत्पन्न, जे त्यांनी स्वत: कमावलं आहे आणि दुसरं उत्पन्न जे त्यांनी कमावलेले नाही, परंतु मालकी मुलांची आहे. कोणत्याही स्पर्धेच्या किंवा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही मार्गाने मूल कमावत असेल तर ते त्याचे कमावलेले उत्पन्न समजलं जातं. 4 / 8पण मुलांना कोणाकडून कोणतीही मालमत्ता, जमीन इत्यादी भेट म्हणून मिळाली तर ती त्याची न कमावलेली कमाई समजली जाते. पालकांनी मुलाच्या नावावर कोणतीही गुंतवणूक केली आणि त्यावर मिळणारं व्याज ही देखील मुलाचं न कमावलेले उत्पन्न मानलं जातं.5 / 8कायदा काय म्हणतो? - आयकर कायद्याचं कलम ६४ (१ अ) अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नाशी संबंधित नियमांशी संबंधित आहे. नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांनी कमाई केल्यास त्याला कर भरावा लागत नाही. त्यांचं उत्पन्न आई-वडिलांच्या उत्पन्नात जोडलं जातं. त्यानंतर पालकांना एकूण उत्पन्नावर विहित कर स्लॅबनुसार आयकर भरावा लागतो.6 / 8तर दुसरीकडे कलम १० (३२) अन्वये मुलांचं १५०० रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. यावरील उत्पन्न कलम ६४ (१ अ) अन्वये त्यांच्या आई-वडिलांच्या उत्पन्नाशी जोडलं जातं.7 / 8आई आणि वडील दोघेही कमावत असतील तर जास्त उत्पन्न असलेल्या दोघांच्या उत्पन्नात मुलाचं उत्पन्न जोडून कराची गणना केली जाते. लॉटरीत अल्पवयीन मुलानं पैसे जिंकले तर त्यावर थेट ३० टक्के टीडीएस कापला जातो. त्यानंतर या टीडीएसवर १० टक्के अधिभार लावण्यात येत असून ४ टक्के सेसही भरावा लागतो.8 / 8समजा मुलांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असेल तर अशा परिस्थितीत मुलांचा ताबा असलेल्या पालकांच्या उत्पन्नात मुलांचं उत्पन्न जोडलं जातं. याशिवाय मूल अनाथ असेल तर त्याला स्वत: आयटीआर भरावा लागणार आहे. दुसरीकडे, जर मूल कलम ८० यू मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही अपंगत्वानं ग्रस्त असेल आणि अपंगत्व ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्यांचं उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडलं जाणार नाही.