शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:21 IST

1 / 7
Apollo Tyres Owner Net Worth: अपोलो टायर्सनं भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीसाठी मुख्य प्रायोजकाचे हक्क मिळवले आहेत. याचा अर्थ असा की आता अपोलो टायर्सचा लोगो टीम इंडियाच्या जर्सीवर दिसेल. हा करार तीन वर्षांसाठी (२०२७ पर्यंत) करण्यात आला आहे. त्याची एकूण किंमत ५७९ कोटी रुपये आहे.
2 / 7
मागील प्रायोजक ड्रीम११ ने दिलेल्या प्रति सामन्याच्या ४ कोटींपेक्षा हे अधिक आहे. हा करार मिळवण्यासाठी अपोलो टायर्सनं कॅनव्हा आणि जेके सिमेंट्स सारख्या स्पर्धकांना मागे टाकलं. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचं प्रायोजकत्व मिळवणाऱ्या अपोलो टायर्सची एकेकाळी १ रुपयांना विक्री होणार होती. ही कहाणी खूप मनोरंजक आहे. या कंपनीचा पाया रौनक सिंग यांनी घातला होता. आता त्याची कमान त्यांचा मुलगा ओंकार सिंग कंवर यांच्या हातात आहे. ओंकार सिंग यांचा मुलगा नीरज कंवर देखील कंपनीत प्रमोटर आहे.
3 / 7
अपोलो टायर्स ही देशातील दुसरी सर्वात मोठी टायर कंपनी आहे. ओंकार सिंग कंवर हे अपोलो टायर्सचे सह-संस्थापक रौनक सिंग यांचे मोठे पुत्र आहेत. ते कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म पाकिस्तानातील सियालकोट येथे झाला. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान ते आपल्या कुटुंबासह भारतात आले. त्यांनी सर्व काही पाकिस्तानात सोडून दिलं.
4 / 7
भारतात सुरुवात करणं त्यांच्या कुटुंबासाठी सोपं नव्हतं. त्यांच्या वडिलांनी देशात पाईपचा व्यवसाय सुरू केला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ओंकार कंवर यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलं. अमेरिकेत शिक्षण आणि काम केल्यानंतर, ते १९६४ मध्ये भारतात परतले आणि कौटुंबिक व्यवसायात काम करू लागले. काही वर्षांनी, कुटुंबानं व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी टायर बनवण्यास सुरुवात केली आणि अपोलो टायर्सची सुरुवात केली.
5 / 7
अपोलो टायर्सची सुरुवात चांगली झाली. पण १९७५ मध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय धोक्यात आला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की ओंकार सिंग कंवर यांचे वडील कंपनी फक्त एका रुपयांना विकू इच्छित होते. तेव्हाच ओंकार सिंग यांनी अपोलो टायर्सची जबाबदारी घेतली. त्यांनी कंपनीला अडचणीतून बाहेर काढलं. आज अपोलो टायर्स एक मल्टीनॅशनल कंपनी बनली आहे.
6 / 7
ओंकार सिंग कंवर यांचा जगातील अब्जाधीशांच्या यादीत अनेकदा समावेश केला जातो. विविध रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १.४ ते १.६ अब्ज डॉलरस इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये, ही रक्कम अंदाजे ₹११,६०० कोटी ते ₹१३,३०० कोटी असू शकते.
7 / 7
नीरज कंवर हे अपोलो टायर्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहेत. त्यांची वैयक्तिक निव्वळ संपत्ती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. दरम्यान, त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे कंपनीत लक्षणीय शेअरहोल्डिंग आहे. कंपनीतील त्यांच्या थेट हिस्स्याच्या आधारे, काही अहवालांमध्ये त्यांची निव्वळ संपत्ती ₹३२ कोटींपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं आहे. परंतु हे केवळ त्यांच्या सार्वजनिकरित्या घोषित केलेल्या शेअर्सवर आधारित आहे आणि त्यात त्यांच्या इतर गुंतवणुकीचा समावेश नाही.
टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघbusinessव्यवसाय