शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maha Shivratri 2024: दर महिन्यात शिवरात्र येते, तरी आजच्या शिवरात्रीला एवढे महत्त्व का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 17:46 IST

1 / 7
महाशिवरात्री म्हणजे शिव पार्वतीचा विवाह सोहळा, एवढीच आपल्याला माहिती असते, मात्र याहीपलीकडे या तिथीशी संबंधित काही पौराणिक उल्लेख आढळतात त्याबद्दलही जाणून घेऊ.
2 / 7
मासिक शिवरात्र दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते. ज्याप्रमाणे भगवान विष्णूंचे उपासक एकादशीचे व्रत करतात तसेच शिवभक्त मासिक शिवरात्रीचे व्रत करतात. मात्र हे व्रत करताना उपास करणे अपेक्षित नसते, तर केवळ शिवपुजेला महत्त्व असते.
3 / 7
श्रावण मासात शिवपुजेला महत्त्व असतेच. शिवाय शंकराचा वार सोमवार म्हणून श्रावणी सोमवारी उपास देखील केला जातो. भगवान शंकरांनी त्या काळात समुद्र मंथन झाले असता त्यातून निघालेले हलाहल प्राशन केले होते. त्यांच्या देहाचा दाह शांत व्हावा म्हणून त्यांना शिवपूजेच्या वेळेस पिंडीवर दूध अर्पण केले जाते. भस्म लावले जाते. बिल्वपत्र वाहिले जाते. एवढी शिवपूजा श्रावणात होऊनही महादेवाचा सण म्हणून मान्यता आहे, ती महाशिवरात्रीला!
4 / 7
दरवर्षी महाशिवरात्री हा सण माघी कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि देवाधिदेव महादेव यांचा विवाह झाल्यामुळे रात्रभर देवलोकात, कैलासात जल्लोष झाला होता. त्या उत्सवाची आठवण अर्थात आजच्या भाषेत सांगायचे तर लग्नाचा वाढदिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो.
5 / 7
पौराणिक कथांनुसार या दिवशी महादेवाच्या अग्निलिंगातुन चराचर सृष्टी निर्माण झाली, म्हणूनही हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसाची आठवण आणि भगवान शंकराप्रती कृतज्ञता म्हणून दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्रीचा आठव करून शिवपूजा केली जाते.
6 / 7
यादिवशी जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेकदेखील केला जातो. अशाच नकळत झालेल्या उपसामुळे तसेच बेलपत्रांच्या अभिषेकामुळे चित्रभानू नावाचा शिकारी शिवलोकात गेला. नकळत घडलेल्या भक्तीतून चित्रभानूला शिवलोक मिळू शकते, तर जाणीवपूर्वक केलेल्या उपासनेमुळे आपला जीव परलोकात जाताना शिवाशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्या दृढ भावनेने शिवकार्य करावे आणि शिव उपासना करावी.
7 / 7
वाईट वृत्तीचा संहार करणे आणि चांगल्या गोष्टींना पाठिंबा देणे हेच शिवकार्य आहे. त्या शिवकार्याची तळी उचलुया आणि महादेवाच्या कृपेस पात्र होऊया!
टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री