शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maha Kumbh 2025:रहस्यमय जीवन जगणारे नागा साधू, यांचा शेवटही असतो रहस्यमयच; कसा ते पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:27 IST

1 / 7
त्यांचे जीवन अनेक रहस्यांनी भरलेले असते. ते हिमालयात राहतात हे सगळ्यांना माहीत असते, पण नेमके कुठे हे कोणीच सांगू शकत नाही. नागा साधूंचा समूह महाकुंभला येतो आणि नंतर कुठेतरी गायब होतो. त्यामुळे त्यांचा शेवट अर्थात अंतिम संस्कार कसा होतो, याबद्दल अनेकांना कुतूहल वाटते. सदर लेखात त्याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेऊ.
2 / 7
हिंदू धर्मात नागा साधूंना मोठे स्थान आहे. कठोर तपश्चर्या, साधे जीवन आणि अनोख्या परंपरांचे जीवन जगणारे हे एक प्रकारे ऋषी आहेत. त्यांचे जगणे जेवढे वैशिष्ट्यपूर्ण असते तसाच त्यांचा शेवटही वेगळा असतो. नागा साधूंचे अंतिम संस्कार सामान्य लोकांप्रमाणे केले जात नाहीत. त्यांचा दहन विधी न करता त्यांना ‘जल समाधी’ किंवा ‘भू समाधी’ दिली जाते.
3 / 7
जेव्हा नागा साधूंचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचे शरीर पूर्ण फुलांनी सजवले जाते आणि गंगाजलाने स्नान घातले जाते. यानंतर त्याचे शरीर पद्मासन स्थितीत बसवले जाते आणि जिथे त्यांचा देह समाधिस्थ ठेवणार आहे, तिथे खड्डा खणून मंत्रोच्चार करत देह ठेवला जातो आणि मातीने खड्डा भरला जातो.
4 / 7
जर कोणा नागा साधूंना जलसमाधी घ्यायची इच्छा असेल, तर गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत त्यांच्या मृत देहावर मंत्रोच्चार करून जलसमाधी दिली जाते. मात्र हा हक्क सगळ्याच नागा साधूंना असतो असे नाही. हे त्यांच्या आखाड्यानुसार मिळालेल्या अधिकारावरदेखील अवलंबून असते.
5 / 7
वास्तविक, नागा साधू मानतात की त्यांचे शरीर पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांपासून बनलेले आहे. आपल्या देहाचा मृत्यूपश्चात अन्य कोणा जीवाला उपयोग व्हावा या उदार वृत्तीने ते फक्त भू समाधी किंवा जल समाधी घेतात.
6 / 7
नागा साधू कठोर तपश्चर्या करतात आणि सर्वस्वाचा त्याग करतात. हे संत मानवांमध्ये सर्वात पवित्र मानले जातात. एका सामान्य व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी ६ वर्षे लागतात. या सहा वर्षांत त्यांना कठोर सराव करावा लागतो. अनेक वर्षे गुरूंच्या सेवेत तल्लीन राहावे लागते. असे म्हणतात की जेव्हा आदि शंकराचार्यांनी ४ मठांची स्थापना केली, तेव्हा या मठांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नायनाट करण्यासाठी एक गट तयार करण्यात आला होता, हा गट सशस्त्र नागा साधूंचा होता. तेव्हापासून आजपर्यंत नागा साधूंचा एक गट देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तैनात असतो.
7 / 7
मुघल काळात मुघलांनी काशी विश्वेश्वराच्या मंदीरासह अनेक धार्मिक स्थळांवर आक्रमण करून हिंदूंना बंदिस्त केले, तेव्हा नागा साधूंची टोळी शस्त्र घेऊन लढण्यासाठी सज्ज झाली आणि त्या युद्धात अनेक नागा साधू हुतात्मे झाले. त्यांच्या या बलिदानाला स्मरून धर्मपीठाने त्यांना कुंभमेळयात होणार्‍या शाही स्नानाचा पहिला मान दिला, ती परंपरा आजतागायत सुरू आहे.
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा