शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:24 IST

1 / 6
सद्यस्थितीत तरुणांना एका रात्रीत फेमस व्हायचं आहे. आपल्या रीलला लाखो व्ह्यूज यावेत, त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळावे, ऐषोरामी जीवन जगावे हे त्यांचे ध्येय असते. पण या दिवास्वप्नापायी ते लाखो मौलिक क्षण स्क्रोलिंग करण्यात वाया घालवत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण जर तुम्ही हा लेख स्क्रोल करून पुढे न ढकलता इथपर्यंत पोहोचला आहात तर तुम्ही तुमचे जीवन बदलण्यासाठी तीन आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहात हे नक्की!
2 / 6
चला तर, यशाकडे जाणारा शॉर्ट कट नाही तर लॉँग कट पण यशाची ग्वाही देणारा मार्ग पाहूया. जिथे एका रात्रीत प्रसिद्धी मिळणार नाही, पण एकदा का प्रसिद्धी मिळाली की ती कधीही कमी होणार नाही. अशा चिरंतन सुखाचा मार्ग जाणून घेऊ. त्यासाठी आपल्याला पुढील तीन ठिकाणी जाण्यास आजपासून सुरुवात करायची आहे.
3 / 6
जिममध्ये जाऊन व्यायामाची सुरुवात करणे ही आयुष्याला कलाटणी देण्याची पहिली पायरी आहे. आपला स्थायी भाव आळसाकडे झुकणारा असल्यामुळे आपणहून व्यायाम करायचा ठरवला तरी नव्याचे नऊ दिवस उत्साह टिकतो आणि पुन्हा आळस आडवा येतो. म्हणून जिम, व्यायामशाळा, योगाभ्यास वर्ग, झुंबा क्लासमध्ये ऍडमिशन घ्या आणि रोज ४० मिनिटे घाम गाळा. शरीर सुदृढ करा. लक्षात ठेवा, व्यक्तिमत्त्वाची छाप पडते. आणि व्यक्तिमत्व त्याचेच चांगले दिसते, जो शरीराने सुदृढ असतो. अशी व्यक्ती दिसायला सुमार असली तरी फिटनेसमुळे रुबाबदार दिसू शकते. कोणतेही कपडे त्यांच्यावर खुलतात. लोक त्यांच्याशी आपणहून मैत्री करतात. त्यामुळे पहिला बदल आयुष्यात घडवायचा असेल तर व्यायाम सुरु करा.
4 / 6
रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे लोकांवर छाप पडेल पण त्यांच्या कायम स्मरणात राहायचे असेल तर ज्ञान वाढवा. विद्वानम सर्वत्र पूज्यते, असे सुभाषितकार म्हणतात. ही ज्ञानप्राप्ती व्हॉट्स अप युनिव्हर्सिटीतून मिळवलेली नको, तर ग्रंथांमधून मिळालेली हवी. ग्रंथालयात पुस्तकांच्या सान्निध्यात गेल्यावर कोणत्याही विषयाची अधिकृत आणि सखोल माहिती मिळते. स्क्रोलिंगचा वेळ पुस्तक वाचण्यात घालवला तर लोक तुम्हाला फेसबुक, इस्न्टाग्रामवर नाही तर गुगलवर सर्च करतील. यासाठी दुसरा बदल म्हणजे ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचण्याची सवय लावून घ्या.
5 / 6
'विद्या विनयेन शोभते' अर्थात ज्ञान आले, व्यक्तिमत्त्व सुधारले पण अहंकार भरलेला असेल तर अशा व्यक्तीला कोणी विचारत नाही. ती व्यक्ती स्वतःला सर्वज्ञ समजू लागते. तसे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपल्यापेक्षा कोणी वरचढ आहे आणि कायम राहणार आहे याची जाणीव म्हणून रोज मंदिरात जाण्याची सवय लावून घ्यावी. देवासमोर झुकावे, नतमस्तक व्हावे. आपल्याला मिळालेले आयुष्य, आरोग्य, ज्ञान हे त्याच्या कृपेने मिळाले आहे असे म्हणत लीन व्हावे, तरच अंगात आपोआप विनम्रता बाणली जाते. म्हणून तिसरी सवय म्हणजे मंदिरात जाण्याची सवय आजपासून सुरु करा
6 / 6
या तीन सवयी सलग पाच वर्ष केल्या तर तुमचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले होईल. तुमची सामाजिक उंची वाढेल. मानसन्मान वाढेल. लोक तुमचे मत विचारू लागतील, तुमचा सल्ला घेऊ लागतील. अर्थात हे घडण्यासाठी सलग पाच वर्षं खर्च करावी लागतील, हे कायम ध्यानात ठेवा.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीLifestyleलाइफस्टाइल