शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hanuman Jayanti 2025: रामभक्त हनुमान चिरंजीवी आहेतच, पण अन्य ६ चिरंजीवी कोण? चला जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:46 IST

1 / 8
चिरंजीव कोणकोणते हे आठवायचे असेल तर सर्वात आधी हा श्लोक तोंडपाठ करून टाका- 'अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥' अर्थ - अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य व भगवान परशुराम हे सप्त चिरंजीव म्हणून प्रसिद्ध आहेत. चिरंजीव अर्थात ज्यांचा कधीही मृत्यू होणार नाही, असे ७ जीव!
2 / 8
पौराणिक कथेनुसार बली एक असुर राजा व सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. हा विरोचनाचा पुत्र व भक्त प्रल्हादाचा नातू होय. भक्त प्रल्हादाचे हा आपल्या आजोबाप्रमाणे विष्णूचा भक्त होता. हा अतिशय दानी होता. ह्याच्या पित्याचा इंद्राने कपटाने वध केला. त्याचा सूड म्हणून ह्याने इंद्राशी युद्ध करून त्याला स्वर्गातून हाकलून लावले. पुढे इं‍द्राने विष्णूकडे बलीच्या वधासाठी विनंती केली. विष्णूने वामनावतार घेतला व बलीकडून स्वर्ग आणि पृथ्वीचे राज्य दानाच्या रूपात परत घेऊन बलीचा वध न क‍रता त्याला पाताळात ढकलून दिले. तिथे तो लोकाचा राजा झाला.
3 / 8
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. तयांनी धारिणीशी विवाह केला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना 'शरादपि शापादपि' असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.
4 / 8
हनुमान रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले. तेव्हा रामाने हनुमानाला चिरंजीवी होण्याचे वरदान दिले.
5 / 8
कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे गुरू होते. नंतरचे गुरू द्रोणाचार्य. तसेच ते अश्वत्थामाचे मामा होते. ते युद्धाच्या वेळी कौरवांच्या बाजूने लढले. ते त्यांच्या तपोबलावर चिरंजीवी झाले.
6 / 8
विभीषण (बिभीषण) हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम-रावण युद्धामध्ये रामाला मदत केली. रावणासारखा असुर भाऊ असूनही विभीषण सत्याच्या बाजूने उभा राहिला म्हणून त्यालाही चिरंजीवी होण्याचे वरदान लाभले.
7 / 8
पराशर ऋषींचे पुत्र महर्षी व्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांना कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात, आणि ते सप्तचिरंजीवांतील एक असल्याचे मानले जाते.
8 / 8
अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा. अश्वत्थाम्याने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्ध संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला 'पांडवांची शिरे कापून आणतो' असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले नाही. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. आपला निर्वंश होणार हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला त्याला शोधत आले.यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानले जाते.
टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीramayanरामायणMahabharatमहाभारत