शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:18 IST

1 / 8
असे म्हणतात की मनुष्य जन्म हा आत्म्याचा प्रवास संपवण्याच्या दृष्टीने शेवटचा पर्याय असतो. या जन्मात सत्कर्म केले तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आत्मा मुक्त होतो आणि वाईट कर्म केले तर पुन्हा ८४ लक्ष योनी मधून त्याला प्रवास करावा लागतो. म्हणून मोक्ष मिळावा अशी प्रत्येक साधकाची इच्छा असते. मोक्ष म्हणजे काय? तर सुटका! जी प्रत्येकाला हवी असते. त्यासाठी काय करावे लागते, त्याचे उत्तर गरुड पुराणात सापडते.
2 / 8
मरण कोणालाही चुकले नाही. ते येईपर्यंत जगण्याचा प्रवास सुरु राहणार आहे. या प्रवासात सत्कर्माला जोड द्यायची आहे ती अध्यात्मिक उपासनेची आणि गरुड पुराणात दिलेल्या पाच उपायांची. जीवाचा सुरु झालेला प्रवास शिवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते उपाय दिले आहेत ते जाणून घेऊ.
3 / 8
गरुड पुराणात उल्लेख केल्यानुसार एखादी व्यक्ती मरणोन्मुख असेल, अर्थात मृत्यूच्या दारात झुरत असेल तर त्या व्यक्तीसाठी पुढील उपाय केले पाहिजे. याबाबत संत महात्मे सांगतात, हे उपाय मृत्यूच्या शेवटच्या क्षणी आपल्यासाठी कोणी करेल न करेल, जिवंतपणी तुम्ही ते उपाय जरूर करा.
4 / 8
गंगाजलाचे महत्त्व - गंगाजल मोक्ष देणारे आणि पापांचा नाश करणारे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी तोंडात गंगाजल घातले, तर त्याचा मृत्यू शांतीपूर्ण होतो आणि त्याला मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. जिवंतपणी ज्यांना शक्य आहे त्यांनी आयुष्यात एकदा तरी गंगास्नान अवश्य करावे.
5 / 8
भगवद्गीता ऐकणे - गरुड पुराणानुसार, मृत्युशय्येवर असलेल्या व्यक्तीसमोर भगवद्गीतेचे पठण केल्याने मृत्यूची प्रक्रिया सुलभ होते, शांत होते. जीवाची तगमग होत नाही. त्याबरोबरच जिवंतपणी भगवद्गीता वाचली आणि त्याचे चिंतन केले तर व्यक्तीची जगण्याची प्रक्रिया सोपी, सहज आणि सुलभ होते.
6 / 8
तुळशीचे महत्त्व - तुळशी ही भगवान विष्णूंना पवित्र आणि प्रिय मानली जाते. जर मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या तोंडात तुळशीचे पान ठेवले तर त्या व्यक्तीला देह पवित्र होतो आणि तो ईश्वराला समर्पित करण्यासाठी पात्र ठरतो. रोज तुळशीची पूजा केली, रोज सायंकाळी देवापाशी दिवा लावला तर त्यातून मिळणारी मन:शांती देहाची, मनाची तगमग दूर करते.
7 / 8
भगवंताचे नामस्मरण - मृत्युच्या वेळी प्रभू विष्णूचे नामस्मरण केल्याने मोक्ष मिळतो, पण ते नाम अंत:करणापासून घेतलेले असावे. मात्र आयुष्यभर नामस्मरण केले असेल, तर आपल्या जिभेला, मनाला देवाचे नाम घेण्याची प्रेरणा मिळेल आणि शेवटच्या क्षणी ते नाव ओठी येऊन मोक्ष मिळेल.
8 / 8
पापांची कबुली - मृत्यू समीप आला की आयुष्यात केलेली सगळी पापं आठवू लागतात, त्याची देवासमोर मनोमन कबुली द्यावी आणि मोक्ष मिळावा म्हणून प्रार्थना करावी. संत सांगतात, पाप करूच नका आणि चुकून माकून झालेच तर रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या पापाचे क्षालन होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. कारण, पुढचा दिवस आपल्या बघण्याची संधी मिळेल वा नाही हे आपल्याही हाती नाही.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्षTraditional Ritualsपारंपारिक विधीPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण