इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:16 IST
1 / 8पर्यावरण रक्षण आणि कच्च्या तेलावरील आयातीवर होणारा पैसा वाचविण्यासाठी केंद्र सरकारने भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला १० टक्के इथेनॉल मिसळले जात होते, आता ते वाढून २० टक्के करण्यात आले आहे. परंतू, यामुळे इंजिन मार खात असून त्याचे नुकसान झाल्याने वाहनांच्या नादुरुस्ती आणि मेन्टेनन्समध्ये वाढ झाली आहे. यामुळे इथेनॉलवर चालवाव्या लागणाऱ्या गाड्या म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार वाहनचालकांना वाटू लागला आहे. वाहनचालकांच्या या चिंतेवर आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. 2 / 8अनेक वाहन मालकांनी इथेनॉल-मिश्रित पेट्रोल इंजिनला होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. जुन्या कारमध्ये इथेनॉल-मिश्रित इंधन वापरल्याने केवळ मायलेजवर नकारात्मक परिणाम होऊ शकत नाही तर इंजिनचे आयुष्य देखील कमी होऊ शकते आणि दुरुस्तीचा खर्च देखील वाढू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. 3 / 8हा मुद्दा पेटत असल्याचे पाहून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक्सवर खुलासा केला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने वाहनांचे नुकसान होत आहे किंवा ग्राहकांना अनावश्यक त्रास होत आहे, हे तथ्य नाही असे मंत्रालयाने म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण हे एक दूरदर्शी, वैज्ञानिकदृष्ट्या समर्थित आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार उपाय आहे. 4 / 8कार्बोरेटेड आणि इंधन-इंजेक्टेड वाहनांवर पहिल्या एक लाख किमी अंतर कापून निरीक्षण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर १०,००० किमीवर केलेल्या तपासणीत कुठेही पॉवर, टॉर्क किंवा मायलेजवर कोणताही नकारात्मक परिणाम दिसलेला नाही.5 / 8ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (IIP) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (R&D) यांनी देखील केलेल्या चाचण्यांमध्ये ई २० इंधनावर जुन्या वाहनांमध्ये देखील कोणतीही समस्या आढळलेली नाही, असे स्पष्टीकरण मंत्रालयाने दिले आहे. 6 / 8इथेनॉल मिश्रित इंधनामुळे मायलेज मात्र कमी होते, या लोकांच्या दाव्यावर मंत्रालयाने होकार दिला आहे. नियमित पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची ऊर्जा घनता कमी असते. यामुळे मायलेजमध्ये थोडी घट होते. E10 साठी डिझाइन केलेल्या आणि E20 साठी कॅलिब्रेट केलेल्या चारचाकी वाहनांसाठी जे 1-2% आणि इतर वाहनांसाठी सुमारे 3-6% ही घट असू शकते. चांगल्याप्रकारे इंजिन ट्युनिंग केले आणि E20-अनुरूप घटक वापरले तर ही घट थोडी कमी केली जाऊ शकते असे मंत्रालयाने म्हटले आहे. 7 / 8इथेनॉलच्या वापरामुळे वाहनाच्या इंजिन यंत्रणेला, कार्बोरेटरला किंवा इंधन इंजेक्टरला नुकसान होते आणि महागड्या दुरुस्तीला कारणीभूत ठरते, या दाव्यावर देखील मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. 'BIS मार्गदर्शक तत्त्वे आणि ऑटोमोटिव्ह उद्योग मानकांद्वारे E20 इंधनाची पडताळणी चांगली केली जाते. तथापि, काही जुन्या वाहनांमध्ये सुमारे 20,000 ते 30,000 किमी दीर्घकाळ वापर केल्यानंतर, काही रबर भाग/गॅस्केट बदलण्याची शिफारस केली जाऊ शकते. हे बदलने स्वस्त आहे आणि वाहनाच्या नियमित सर्व्हिसिंग दरम्यान सहजपणे करता येते.', असे मंत्रालयाने म्हटले आहे. 8 / 8एकंदरीतच जुन्या कार किंवा दुचाकींवर इथेनॉलच्या पेट्रोलचा परिणाम होत आहे, हे ग्राहकांचे म्हणणे फारसे चुकीचेही नाही. परंतू, हा टक्का मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार फार मोठा नाही. काही जास्त अंतराने येणारा मेन्टेनन्स हा जरा लवकर येऊ शकतो. मायलेजवर चार-पाट टक्के परिणाम होऊ शकतो, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.