परभणी: शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू झालेल्या आंदोलनास सहा महिने पूर्ण झाले असूनही केंद्र शासनाने या आंदोलनाची उपेक्षा केल्याच्या निषेधार्थ २६ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळ्यात आला.
कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शेतकरी व कामगार विरोधी कायदा रद्द करावा, सर्व जनतेचे १०० टक्के लसीकरण शासनाच्या वतीने करावे, निष्काळजीपणामुळे झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्यात यावा, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांना पिक विमा भरपाई द्यावी, सर्व जॉबकार्डधारक मजुरांना ७ हजार ५०० रुपये प्रतिमाह कोविड लॉकडाऊन मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या निषेधार्थ २६ मे काळा दिवस पाळण्यात आला. यानिमित्त घरावर काळे झेंडे लावणे, काळ्या फिती लावणे, निवडक ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली. आंदोलनात कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मण काळे, शेख अब्दुल, माधुरी क्षीरसागर, ज्ञानेश्वर काळे, श्रीनिवास वाकणकर, बाळासाहेब हरकळ, नवनाथ कोल्हे, शिवाजी कदम, तुषार पालकर, आसाराम जाधव, आसाराम बुधवंत, ओंकार पवार, सरपंच प्रकाश गोरे, अनिल पंडित आदींनी सहभाग नोंदविला. आंदोलनानंतर कार्यकत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेले.