लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एकेकाळी पीक विम्यासाठी संबंधित कंपनीवर मोर्चा काढणारी शिवसेना आता या प्रश्नावर गप्प का आहे? असा प्रश्न विचारत आमदार मेघना बोर्डीकर यांनी कृषिमंत्र्यांच्या गोलगोल उत्तराचा शुक्रवारी सभागृहात निषेध केला.
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. या अनुषंगाने विधानसभेत शुक्रवारी उपस्थित झालेल्या मुद्द्यावर बोलताना जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या बांधावर जावून हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला होता. २०१९ विधानसभा निवडणुकीच्या आधी याच शिवसेनेने पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, यासाठी मोर्चे काढले होते. शिवसैनिकांनी विमा कंपनीचे कार्यालय फोडले होते. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. असे असताना विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. विमा मिळत नाही तरीही शिवसेनेचे मंत्री आणि शिवसैनिक आता गप्प का? शिवसेनेची तेव्हाची आणि आताची भूमिका यात तफावत दिसून येत आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री सरकारमध्ये असल्याने पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. कृषिमंत्री दादा भुसे हे याविषयी ठोस उत्तर देत नसून, गोलगोल उत्तर देत असल्यामुळे आमदार बोर्डीकर यांनी त्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.