परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोना नसलेल्या गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या रुग्णांसाठी शहरात पुरेसे अद्ययावत रुग्णालय उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
मागील काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गुंतली आहे. पण, त्याचबरोबर दुसरीकडे कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांकडे आरोग्य विभागाचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. हृदयविकार, सर्पदंश, विषबाधा, अपघातातील गंभीर जखमी, पॅरलिसीस यांसारख्या अत्यवस्थ रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. शहरात मोजकीच रुग्णालये या रुग्णांसाठी उपलब्ध असून, त्या ठिकाणीही जागा शिल्लक नसल्याने या रुग्णांना नाईलाजाने परत पाठवावे लागत आहे. त्यामुळे कोरोना नसताना आणि गंभीर आजारी असलेल्या या रुग्णांवर आता उपचार कुठे करावेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन कोरोनाच्या नियंत्रणात गुंतले असताना कोरोनेतर रुग्णांसाठी मात्र दवाखानाच शिल्लक ठेवला नसल्याची स्थिती आहे.
हृदयविकार आणि इतर आजारांच्या अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत तर त्यांचाही मृत्यू होऊ शकतो. परंतु या रुग्णांसाठी पुरेसे बेड आणि दवाखाने उपलब्ध नसल्याने रुग्णांची मात्र हेळसांड होत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करतानाच दुसरीकडे कोरोना नसलेल्या गंभीर रुग्णांसाठीही काही आयसीयू रुग्णालये राखीव ठेवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
१९ खासगी रुग्णालयात कोविडचे उपचार
परभणी शहरात विविध आजारांवर अद्ययावत वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांसह इतर अशा एकूण १९ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ही सर्व रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांसाठी असल्याने या रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार होत नाहीत. शहरात साधारणत: ८ ते ९ अद्ययावत खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी केवळ दोन खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना वगळता इतर रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयातील बेड आता कमी पडू लागले आहेत. त्यामुळे कोरोनावगळता इतर आजारांसाठीही काही रुग्णालये राखीव ठेवावीत, अशी रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे.
दररोज ८ ते १० रुग्णांना जावे लागते परत
कोरोना वगळून इतर आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने दररोज अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या किमान ८ ते १० रुग्णांना परत पाठवण्याची वेळ आली आहे. या रुग्णांसाठी रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्याने त्यांनी जावे कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.