परभणी हे दक्षिण मध्य रेल्वे विभागातील महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून मुंबई, दिल्ली, पुणे यासह नागपूर आणि दक्षिण व उत्तर भारत यांना जोडणाऱ्या अनेक रेल्वे ये-जा करतात. कोरोनापासून आतापर्यंत केवळ २० ते २५ विशेष रेल्वे सुरू आहेत. कोरोनापूर्वी पॅसेंजर मिळून ५० रेल्वेची ये-जा होती. यातही पॅसेंजर रेल्वे पूर्णपणे बंद आहेत, तर मुंबई जाणाऱ्या महत्त्वाच्या पाच रेल्वेंपैकी सध्या दोन रेल्वे बंद असल्याने अनेक प्रवाशांना आरक्षण मिळेनासे झाले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यांत असलेल्या छोट्या-मोठ्या स्टेशनवर थांबणाऱ्या पॅसेंजर रेल्वे मात्र अद्यापही बंद असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या स्थानकावर उतरून पुन्हा खासगी प्रवासी वाहनाने गाव गाठण्याची वेळ अनेकांवर आली आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई जाणारी नंदिग्राम व पुणेमार्गे पनवेल जाणारी पनवेल एक्स्प्रेस रेल्वे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नांदेड-मुंबई तपोवन
सिकंदराबाद मुंबई देवगिरी
नांदेड-मुंबई राज्यराणी
नांदेड-पुणे साप्ताहिक रेल्वे
धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस
ओखा रामेश्वरम साप्ताहिक एक्स्प्रेस
नांदेड-दिल्ली सचखंड एक्स्प्रेस
शिर्डी-विशाखापटनम एक्स्प्रेस
मनमाड-सिकंदराबाद एक्स्प्रेस
नांदेड-बंगळुरू एक्स्प्रेस
या रेल्वे कधी सुरू होणार
नागपूर-मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस
परभणी-नांदेड-तांडूर एक्स्प्रेस
नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस (एक सुरू, एक बंद)
नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस
अमरावती-पुणे
पॅसेंजर गाड्यांचे घोडे कुठे अडले
परभणी रेल्वेस्थानक येथून कोरोनापूर्वी किमान २० ते २४ पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. सध्या या सर्व रेल्वे बंद आहेत. यातील औरंगाबाद-हैदराबाद ही रेल्वे सध्या विशेष एक्स्प्रेस म्हणून धावत आहेत. मात्र, या रेल्वेला केवळ प्रमुखस्थानकांवर थांबा दिला आहे. पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय नांदेड विभाग, सिकंदराबाद विभाग यांच्या अखत्यारित येत नसल्याने याबाबत रेल्वेस्थानक प्रशासनाला कोणतीही माहिती नाही. रेल्वे बोर्ड दिल्ली यांनी निर्णय घेतल्यावर सर्व पॅसेंजर सुरू होतील. तोपर्यंत प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
प्रवाशी काय म्हणतात
पुर्णा-नांदेड ये-जा करण्यासाठी विशेष रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवेश दिला जात नाही. नांदेडला खासगी नोकरी करण्यासाठी रेल्वेने ये-जा करणे हा एकमेव मार्ग आहे. परंतु, रेल्वे विभाग सध्या महिनेवारीचे पासही देत नसल्याने गैरसोय होत आहे. - विनोद काळे, पूर्णा
पिंगळी, मिरखेल, पेडगाव, सिंगणापूर आणि अन्य छोट्या स्थानकावर थांबणाऱ्या पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने या गावातील भाजीपाला, दूध तसेच अन्य साहित्य जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आणणे अवघड जात आहे. यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
- रामा बोबडे, भोगाव