सेलू तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात पाच दिवसांपूर्वी वादळी वारे आले होते. या वादळी वाऱ्यात शासकीय विहिरीवर वीजपुरवठा करणाऱ्या लाइनवरील एक विद्युत पोल तुटून पडला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाच दिवसांपासून देवगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी ग्रामस्थ व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. यादरम्यान ग्रामपंचायतच्या सरपंच जिजाबाई सोन्ने, उपसरपंच चंद्रकला सातपुते, सदस्य राधा साळेगावकर, गुंफाबाई चव्हाण यांनी महावितरणच्या उपविभागाकडे याबाबतची माहिती देऊन दुरुस्ती करण्याची विनंती केली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा पोल कधी दुरुस्त होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पाणीपातळी कमी झाल्यामुळे ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तांत्रिक अडचणींबाबत महावितरण गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे ग्रामीण भागांमधून संताप व्यक्त होत आहे. महावितरण विभागाने याकडे लक्ष देऊन किरकोळ दुरुस्ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.
पाच दिवसांपासून देवगावफाटा येथील पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST