परभणी : नवीन पाणीपुरवठा योजना कार्यरत झाल्यानंतर काही भागात सहा तास पाणीपुरवठा करूनही सर्व घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे प्रभावतीनगर, सहकारनगर या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या कायम आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर या भागातील पाणी समस्या दूर होईल, अशी आशा निर्माण झाली होती. येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये अनेक नागरिकांनी नवीन नळ योजनेवर जोडणी घेतली आहे. या अंतर्गत पाणीपुरवठाही सुरू झाला आहे. मात्र, प्रभावतीनगर, सहकारनगर या भागात चार महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सहा- सहा तास पाणी सोडल्यानंतर हे पाणी सर्व घरांपर्यंत पोहोचत नाही. यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आले. मनपाच्या अभियंत्यांनी तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्नही केला; परंतु त्यांना अद्यापपर्यंत बिघाड दुरुस्त करण्यात यश आले नाही. त्यामुळे प्रभावतीनगर, सहकारनगर या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या कायम आहे. तेव्हा येथील नागरिकांना जुन्याच योजनेतून योग्य दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात नगरसेवक बाळासाहेब बुलबुले यांनी हा प्रश्न थेट विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मांडला आहे.