खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खताची मागणी वाढली आहे. संचारबंदीमुळे सध्या येथील बाजारपेठेत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उलाढाल होत आहे. जिल्हाभरातून शेतकरी बाजारपेठेत दाखल होत असले तरी खरेदी मात्र होत नाही. बाजारभावाची विचारपूस करून शेतकरी सध्या अंदाज घेत आहेत. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. ही बाब लक्षात घेता, दोन्ही बियाणांना मागणी आहे. मात्र मागील वर्षी कापसात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने या वर्षी १ जूनपर्यंत कापूस बियाण्यांच्या विक्रीसाठी परवानगी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या तरी खताला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. १० ते १५ टक्के उलाढाल झाली असून, ही उलाढाल अधिक आहे.
मागील सहा महिन्यांपासून येथील मोंढा बाजारपेठ ठप्प आहे. मे महिन्यात बाजारपेठेतील उलाढाल वाढते. दरवर्षी मे महिन्यामध्ये खताच्या विक्रीतून मोठी उलाढाल होते; परंतु या वर्षी बाजारपेठेला वेळेचे बंधन असल्याने या उलाढालीवरही परिणाम झाला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच शेतकरी बाजारात खरेदीसाठी मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या तरी पावसाची प्रतीक्षा आहे.
तीस टक्क्यांनी वाढले सोयाबीनचे दर
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीनचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचा फटका सहन करावा लागणार आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळाल्याने सोयाबीन बियाणांचे भावही वाढले आहेत. या वर्षी सोयाबीन बियाणांचा बाजारपेठेत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.