- विठ्ठल भिसेपाथरी : तालुक्यातील तुरा गावातील महिलांनी गावात दारूबंदी करावी, यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी यांना साकडे घातले. विशेष म्हणजे, महिलांनी गावातील दारूबंदीच्या प्रश्नावर मतदान घ्या, अशी मागणी सुद्धा केली आहे.
तुरा गावातील महिलांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. गावामध्ये परवानाधारक एकूण तीन दारूची दुकाने आहेत. गावात दारूच्या दुकानामुळे अनेक कुटुंबांमध्ये सतत वाद, विवाद, भांडणे होतात. महिलांना वेळप्रसंगी पुरुषांकडून दारू पिण्यास पैसे न दिल्याने मारहाणीचे प्रकार सुद्धा घडत आहेत. या प्रकारामुळे घरात विविध समस्या निर्माण होत आहेत. दारूमुळे गावातील युवकांसह पुरुषांना व्यसन लागले आहे. त्यामुळे गावात दारूबंदी करणे हे गरजेच आहे. प्रशासनाने प्रत्यक्षात गावात अधिकारी पाठवून दारूबंदी करावी तसेच दारूबंदीबाबत मतदान घ्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. निवेदनावर मीनाक्षी तोडके, वंदना शेळके, सविता तोडके, राधाबाई तोडके, मुक्ता तोडके, उषाबाई तोडके, रुक्मीनबाई अवचार, राधा सोळंके, रेवता सोळंके, जाईबाई तोडके, सरस्वती धर्मे, उषा तोडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.