गंगाखेड ( परभणी) : ५३ वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या शहरातील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे व प्रा.आर जी लड्डा यांच्यात महाविद्यालय उपहार गृह परिसरातच फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याचा प्रकार बुधवारी (दि.५) सकाळी ११:३० वाजता घडला. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
संत जनाबाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे व वरिष्ठ विभागाचे प्रा.आर.जी.लड्डा यांच्यात सहकारी प्राध्यापकांसोबत चहापाणी सुरू असताना अचानकच शाब्दिक वाद होऊन दोघात चांगलीच हाणामारी झाली. अतिशय जबाबदार पदावर असलेल्या उपप्राचार्य व प्राध्यापकाचा सुरू असलेली हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न सहकारी प्राध्यापकांनी केला. मात्र, कुठलाच उपयोग झाला नाही. उपहारगृहात उपस्थित विद्यार्थ्यांनी हाणामारीचा केलेला व्हिडिओ मात्र भलताच व्हायरल झाला आहे.
खुलासा मागितला, कारवाई होणारदरम्यान, या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एम.धूत यांनी गुरुवारी (दि.६) रोजी संबंधित उपप्राचार्य व प्राध्यापकास २४ तासाच्या आत खुलासा देण्याची लेखी आदेश दिले आहे. श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. संतोष मुंढे यांनी या प्रकरणात कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. तर संस्थेचे माजी संचालक ॲड.नंदकुमार काकाणी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संबंधित घटना दुर्दैवी व लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
शिक्षण क्षेत्रात खळबळनॅक 'अ' दर्जा प्राप्त असलेल्या या महाविद्यालयात नुकत्याच दोन राष्ट्रीय स्तरावरील परिषदा पार पडल्या आहेत. परिषदा पार पडून एक आठवडा उलटणार नाही तोच दोन्ही परिषदांचे समन्वयक असलेल्या उपप्राचार्य व प्राध्यापकात विद्यार्थ्यांसमोरच घडलेल्या हाणामारीमुळे महाविद्यालयाची प्रतिमा खालावली असून शिक्षण प्रेमी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.