परभणी : मागील आठ दिवसांपासून लसीचा पुरेसा साठा नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. मंगळवारी तब्बल १८२ केंद्रांवरील लसीकरण लसीअभावी ठप्प पडले होते.
कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे; परंतु मागच्या आठवडाभरापासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यपातळीवर पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. राज्य शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू केले; परंतु काही दिवसातच हे लसीकरण बंद करावे लागले आहे. सध्या केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी लस दिली जात आहे. त्यातही जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने ४५ वर्षांच्या पुढील दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांनाच प्राधान्य दिले जात आहे.
लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०५ केंद्रांवरून लसीकरण सुरू केले होते; परंतु लस उपलब्ध नसल्याने यातील बहुतांश केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. १८ मे रोजी ६ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील ८ आणि महानगरपालिकेच्या ९ केंद्रांवर लसीकरण सत्र राबविण्यात आले. उर्वरित १८२ केंद्र लसीअभावी बंद ठेवण्यात आले. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, कोरोनापासून पूर्णतः संरक्षण देण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे; मात्र शासन आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
२ लाख ३३ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण
जिल्ह्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांची संख्या सुमारे ६ लाख एवढी असून, १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची संख्याही ६ लाखांपर्यंत आहे. साधारणतः १२ लाख नागरिकांना लसीकरण करणे अपेक्षित असताना जिल्ह्याला आतापर्यंत केवळ २ लाख ४१ हजार लसीचे डोस प्राप्त झाले. त्यातून २ लाख ३३ हजार ३३१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिकांना मात्र लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
३४ टक्के लसीकरण
४५ वर्षांपुढील वयोगटासाठीदेखील पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ ३४ टक्के लसीकरण जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. ४५ वर्षांपुढील १ लाख ७५ हजार ४६० नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यात १ लाख ४५ हजार ७९८ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, २९ हजार ६६२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
युवकांसाठी लस उपलब्ध नाही
जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटासाठी सध्या लसीकरण बंद ठेवले आहे. या नागरिकांसाठी लस उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच लसीकरण केले जात आहे.