पोखर्णी (ता. परभणी) : जिलेटिनच्या स्फोटक कांड्या दुचाकीने घेऊन जाणाऱ्या दोघांना दैठणा पोलिसांनी २५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जिलेटिनच्या ८ कांड्या जप्त केल्या आहेत.
पोखर्णी फाटा येथून परभणीकडे येणाऱ्या रस्त्यावर साधारणत: ५ कि.मी. अंतरावर सुभाष दगडू चव्हाण (५६, रा. वडर गल्ली, परळी) आणि मुकेश नारायणसिंग कच्छवा (३०, रा. सिरसाळा, ता. परळी) हे दोघे दुचाकीने (एमएच१९/ एझेड ८६५८) जिलेटिन कांड्या घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. २५ मार्च रोजी पहाटे १.३५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, त्यांच्या ताब्यातील जिलेटिनच्या ८ कांड्या जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी परभणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रचूड हत्तेकर यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल आडोदे हे तपास करत आहेत.