गंगाखेड : शहरात रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर जडीबुटी विकणाऱ्या सहा कुटुंबांवर संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. या वैदू कुटुंबियांनी १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची भेट घेऊन मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर या कुटुंबांना शिवभोजन थाळीचा लाभ देऊन गावी परतण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कोरोना संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर १७ एप्रिलपासून कडक संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमध्ये अडकलेल्या वैदू कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गंगाखेड शहरात एक महिन्यापासून नांदेड जिल्ह्यातील नरसी नायगाव येथील सहा कुटुंब रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर पाल ठोकून जडीबुटीचा व्यवसाय करतात तसेच त्याचठिकाणी निवास करतात. मात्र, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. १९ एप्रिल रोजी या वैदू कुटुंबांनी मदत मिळण्यासाठी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची भेट घेतली. त्यानंतर तहसीलदारांनी या कुटुंबांना शिवभोजन थाळीचा लाभ देऊन घराकडे परतण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.