मागील आठवडाभरात शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. २३ जुलै रोजीच रामनगर भागात एक घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबविले होते. दरम्यान, शहरातील त्रिमूर्तीनगर परिसरात २२ जुलै रोजी मध्यरात्री तीन चोर फिरत असल्याची बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पुढे आली. विशेष म्हणजे या चोरांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचे दिसत आहेत. शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून, दररोज कुठल्या ना कुठल्या भागात चोरी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नागरिकांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे. पोलिसांनीदेखील शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
चोरांच्या हातात शस्त्र
त्रिमूर्तीनगर भागातील एका घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे जेरबंद झाले आहेत. चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या ते फिरत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे या तीन युवकांपैकी एकाच्या हातात धारदार शस्त्रही असल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.