दैठणा येथील दत्तात्रय दिगंबर कच्छवे यांचे नातेवाईक लातूर येथे दवाखान्यात उपचार घेत असल्याने २५ मार्चला रात्री घराला कुलूप लावून सर्वजण लातूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दत्तात्रय कच्छवे यांच्या घराच्या चॅनेल गेटवरून आत प्रवेश करत घराचे कुलूप तोडले. २६ व २७ मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली. दत्तात्रय कच्छवे यांच्या घराचे कुलूप तुटलेल्याची बाब त्यांच्या घराशेजारी राहणारे किशन कच्छवे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती दत्तात्रय कच्छवे यांना दिली. त्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी दत्तात्रय कच्छवे यांनी २६ मार्चला दैठणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ३ लाख २५ हजार रुपयांचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोख ४ लाख रुपये आणि २ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ७ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सहायक पोलीस निरीक्षक सुनील माने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आरोपीस सात दिवसांची कोठडी
या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यात २८ मार्चला एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.