परभणी : पोलिस दलात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक, शौर्य पदक प्राप्त पोलिस अधिकारी, अंमलदार यांना सन्मानचिन्ह प्रदान केले जातात. सन २०२४ वर्षाकरिता पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. यात जिल्ह्यातील एक सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदार यांचा समावेश आहे.
इरशाद अहमद रऊफ अहमद खान सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि संजय सखाराम घुगे पोलिस हवालदार अशी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. महाराष्ट्र पोलिस राजपत्रअंतर्गत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या स्वाक्षरीने सोमवारी याबाबतची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एकूण ८०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील दोघांचा समावेश असल्याने जिल्हा पोलिस दलाची मान उंचावली आहे.