पाथरी : बेदम मारहाण करून खून केल्यानंतर पाथरी शहरातील नगरपरिषदेच्या स्वच्छतागृहात मृतदेह आणून टाकल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी तिन्ही आरोपींना तत्काळ अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेत नातेवाइकांनी आज दुपारी मृतदेह पोलीस ठाण्याच्यासमोर ठेवत ठिय्या मांडला. आरोपींना 24 तासांत अटक करण्याचे लेखी आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला.
शहरातील शिक्षक कॉलनीतील अनंता हरिभाऊ टोम्पे ( 35) हे मानवत येथील बिहार कॉलनी येथे राहत होते. 14 एप्रिल रोजी दुपारी 2 .30 च्या सुमारास टोम्पे यांना मानवत येथील राहत्या घरातून काही व्यक्तींनी बोलावून घेतले. पैश्यांच्या देवाणघेवाणीतून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात टोम्पे यांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पाथरी येथील नगर परिषदच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात आणून टाकला. हा प्रकार 15 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर मृत अनंता टोम्पे यांच्या पत्नी रुपाली टोम्पे यांच्या फिर्यादीवरून, भारत वाव्हळे, राहुल शिंदे ,अशोक खंडागळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, बुधवारी परभणी येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये शविच्छेदन करण्यात आले. मात्र, तोपर्यंत एकही आरोपी अटकेत नव्हता. यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पाथरी पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवत आरोपींना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत अशी भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी सर्व आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी माळीवाडा येथील स्मशानभूमीत घेऊन गेले.