कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार, याविषयी ३ दिवसांपूर्वी निकालाचे सूत्र जाहीर केले आहे. जूनअखेर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान वाटत नसेल त्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अकरावी प्रवेशासाठी पुढील काळात ऑनलाइन सीईटी आयोजित केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
या सीईटीचे स्वरूप कसे असेल? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार असले तरी नामांकित विद्यालयातील प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना तेथील स्थानिक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीची गुणपत्रिका हातात कधी पडते याची उत्सुकता लागली आहे.
असे असेल नवे सूत्र (बॉक्स)
दहावीच्या विद्यार्थ्याचे वर्षातील लेखी मूल्यमापन ३० गुणांचे असणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत २० गुण राहणार आहेत.
नववीचे विषयनिहाय गुण यासाठी या विद्यार्थ्याना ५० गुण देण्यात येणार आहेत.
विद्यार्थी खूश!
कोरोनामुळे गेले वर्षभर मोजकेच दिवस विद्यार्थ्यांचे वर्ग भरले. त्यामुळे प्रत्यक्ष अध्ययनासाठी या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आता परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थी खूश आहेत. काही गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा हवी होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा होऊ शकलेली नाही.
पुढील प्रवेशाचे काय होणार?
दहावीचा प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्य शासनाने सीईटी घेण्याचे सांगितले असले तरी याचा आराखडा अद्याप निश्चित नाही. नामांकित कनिष्ठ महाविद्यालये मात्र त्यांची स्वतंत्र सीईटी घेतील. इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे धोरण अद्याप अस्पष्ट आहे.
शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात?
कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. आता जाहीर केलेल्या निकालानंतर सर्वसाधारण व गुणवंत विद्यार्थ्यांचे एकत्रच गुण नोंदविले जाणार आहेत. परिणामी मेरिट बाजूला राहिल. यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढतील. त्यामुळे पुढील निर्णय घेणे त्यांना कठीण राहणार आहे. त्यामुळे भविष्यात याचा त्यांच्यावर परिणाम होईल.
- प्रवीण सोनोने, परभणी
मागील शैक्षणिक वर्षात काही शाळांमधून नववीच्या अंतिम परीक्षा झालेल्या नाहीत. शिवाय चालू शैक्षणिक वर्षात शाळा काही काळ सुरू होत्या. त्यामुळे अंतर्गत लेखी मूल्यांकनातसुध्दा व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाचा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अयोग्य वाटतो.
-भूजंग थोरे, सेलू
शासनाने ठरवलेल्या मूल्यांकन धोरणानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणे सोईचे नाही. त्यामुळे या निकालावर कोणतेही प्रवेश देणे याविषयी मतभिन्नता असू शकते. त्यामुळे शासनाने यासंदर्भातील निकष जाहीर करण्यापूर्वी जनभावना लक्षात घेणे आवश्यक होते.
-सदानंद देशमाने, वालूर
पालक काय म्हणतात?
नववीपेक्षा इयत्ता १० वीतील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी जास्त अभ्यास करतात. त्यामुळे इयत्ता नववीच्या मूल्यमापनाच्या आधारे दहावी बोर्डाचे मूल्यमापन करणे अयोग्य आहे. शासनाने नववीच्या मूल्यमापनाचा आधार घेऊ नये.
- सुभाष दुगाणे, पाथरी
दहावी निकाल मूल्यमापनाचे हे सूत्र हुशार विद्यार्थ्याचे बौद्धिक खच्चीकरण करणारे आहे. नववीत कमी अभ्यास करणारे अनेक मुलं दहावी सुरू झाली की खूप अभ्यास करतात. त्यामुळे नववीतील गुणाचा समावेश अयोग्य आहे.
- योगिता नाईक, पाथरी