एकीकडे कोरोना संकटामध्ये नागरिक जीवन जगत आहेत. मात्र, सोनपेठ शहरात भविष्यात होणाऱ्या नगर परिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत अनेकांचे वाढदिवस साजरे करण्याचा धुमाकूळ उठविला जात आहे. त्यामुळे या अशा प्रकरणातून सोनपेठमध्ये कोरोना पसरविण्याचे हे एक आमंत्रणच म्हणावे लागेल. वाढदिवस साजरे करणाऱ्या लोकांवर संबंधित प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. शहरातील विविध गल्लीबोळांत जमाव जमवून वाढदिवस साजरे केले जात आहेत. या बाबीकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. परंतु, संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार आशिषकुमार बिरादर यांनी दिले आहेत. परंतु, संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती मिळू शकली नाही.
सोनपेठमध्ये कोरोनातही धूमधडाक्यात वाढदिवस साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST