- अंकुश वाघमारेपेठशिवणी (जि. परभणी) : पालम तालुक्यात सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले शेखराजूर येथील विकास कदम यांनी मागील काही वर्षांत अनेक सापांना वाचवून नैसर्गिक अधिवासात सोडले. मात्र, याच सर्पमित्राचा सर्पदंशाने ३१ ऑगस्टला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
शेखराजूर येथील विकास भारत कदम (२६) हे सर्पमित्र म्हणून सर्वपरिचित होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते सापांना वाचवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून नवीन जीवन देण्याचे काम करत होते. त्यांच्या या कार्यामुळे परिसरात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. १५ ऑगस्टला एका घरात साप असल्याची माहिती मिळाली. तत्काळ ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सापाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. याच वेळी, अचानक सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने पालम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, मन्यार जातीचा विषारी सर्प असल्यामुळे सर्पविष शरीरात वेगाने पसरल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. अधिक उपचारांसाठी त्यांना नांदेड येथे रुग्णालयात हलविण्यात आले.
१५ दिवस मृत्यूशी झुंजदरम्यान, नांदेड येथे ही डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची ३१ ऑगस्टला दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सोमवारी दुपारी शेखराजूर येथे त्यांच्यावर अत्यं संस्कार करण्यात आले. विकास कदम यांच्या कार्याची आठवण ठेवून अनेजण हळहळ व्यक्त करीत आहेत.