- विठ्ठल भिसे पाथरी( परभणी) : शहरातील येथील बहुचर्तीत व्यापारी संकुल बाबा टॉवरच्या अतिक्रमण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत 11 ऑगस्ट रोजी शासनाने आदेश काढले असून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार आहे. दरम्यान, बाबा टॉवरची मालकी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची असून त्यांनी नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर लागलीच अतिक्रमणावर निणर्य घेण्यासाठी एसआयटी स्थापन झाल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोला येथील काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनी पाथरी येथील बहुचर्चित बाबा टॉवर अतिक्रमण प्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, महसूल मंत्री यांनी या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर महसूल व वन विभागाने हा आदेश काढला. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त हे या पथकाचे अध्यक्ष असतील. पथकात अपर जिल्हाधिकारी परभणी, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे प्रतिनिधी, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाचे प्रतिनिधी तसेच पोलीस अधीक्षक परभणी यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून असतील.
पथकाची कार्यकक्षा• अतिक्रमण प्रकरणांबाबत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करणे• रेघांकन मंजुरी, बांधकाम परवाने, आराखड्यानुसार मोकळी जागा सोडणे, भूखंडांची अदलाबदल, सहाहीस रोडवरील अतिक्रमण आदी बाबींची तपासणी• प्रकरण फौजदारी स्वरूपाचे असल्यास जबाबदारांवर कारवाईबाबत शासनास शिफारस करणे• चौकशीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करणे
काय आहे बाबा टॉवर प्रकरण ...पाथरी शहरातील बसस्थानकाजवळ माजी आमदार बाबाजानी दर्रणी यांच्या मालकीचे बाबा टॉवर हे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. सर्वीस रोडवरील बेकायदेशीर 15 प्लॉटचे अतिक्रमण व मोकळ्या जागेत व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आले आहे, तसेच पाथरी गृहनिर्माण संस्थेच्या मूळ लेआऊटमध्ये बदल करून नियमबाह्य पद्धतीने या संकुलाचे बांधकाम करण्यात येऊन सर्व्हिस रोडवर देखील अतिक्रमण आले आहे, असा आक्षेप घेण्यात आला. या प्रकरणात 8 जुले 2015 रोजी तत्कालीन उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी चौकशी करून हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर या प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या आदेशाने परभणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी 31 मार्च 2023 चौकशी करून अहवाल सादर केला होता. या दोन्ही चौकशीमध्ये बाबा टॉवरचे बांधकाम अवैध आणि नियमबाह्य असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, राजकीय दवाबा पोटी या प्रकरणी पुढे कारवाई झाली नव्हती. आता राजकीय परिस्थिती बदलली असून लागलीच कारवाई सुरू झाल्याने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत.