परभणी : आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या किटचा तुटवडा निर्माण झाल्याने तपासण्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता साधन सामग्रीच्या उपलब्धतेकडेही आरोग्य विभागाला कटाक्षाने लक्ष द्यावे लागणार आहे.
मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज नव्या रुग्णांना दाखल करून सर्वसामान्य नागरिकांचा कोरोनापासून प्रतिबंध करण्याचे प्रयत्न प्रशासन करीत आहे. यासाठी आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी तपासण्या वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परभणी शहरासह प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तपासणी करण्याचे नियोजन केले. सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु मागच्या दोन आठवड्यांपासून मात्र या तपासण्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. दररोज केवळ ७०० ते ८०० तपासण्या होत असल्याने संशयित रुग्णांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या तपासण्या झाल्या नाहीत. शहरातही महानगरपालिकेने विविध ठिकाणी आरटीपीसीआर तपासणी केंद्र सुरू केले होते; परंतु किटअभावी हे केंद्र बंद ठेवावे लागले. मागील काही दिवसांपासून आरोग्य प्रशासन किट उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आरटीपीसीआरचे किट मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम तपासणीवर झाला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या केंद्राच्या पथकानेदेखील तपासण्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे किटची संख्या वाढवून तपासण्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
३० हजार किट जिल्ह्याला प्राप्त
जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या किटचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य विभागाने किटची मागणी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे नोंदविली होती. या मागणीनुसार १३ एप्रिल रोजी ३० हजार किट प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बुधवारपासून तपासण्या वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या तरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर केंद्रांवर किटचा तुटवडा असून, तपासण्यांची संख्या कमी आहे. मंगळवारी ३० हजार किट प्राप्त झाले असून, हे किट पंधरा ते वीस दिवस पुरतील. त्यामुळे वाढीव किटची मागणी आताच नोंदविण्याची गरज निर्माण झाली आहे.
रुग्ण वाढल्याने तपासणीकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाही परिणाम आरटीपीसीआर तपासण्यांवर झाला आहे. रुग्णांना कोरोनामुक्त करण्यास आरोग्य यंत्रणा गुंतली असून, नवीन रुग्ण शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तपासण्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
दररोज अडीच हजार तपासण्यांचे उद्दिष्ट
जिल्ह्यात दररोज अडीच हजार नागरिकांच्या आरटीपीसीआरच्या साह्याने तपासण्या करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र मागच्या संपूर्ण आठवड्यामध्ये १ हजार पेक्षाही कमी नागरिकांच्या तपासण्या झाल्या. आता किट उपलब्ध झाल्यामुळे या तपासण्या वाढविण्याची गरज आहे.