परभणी : केवळ किराणा आणि भाजी विक्रीच्या दुकानांना दुपारी दोन वाजेपर्यंत सवलत दिली असली तरी मंगळवारी शहरात किरकोळ विक्रेत्यांनी आदेश झुगारत दुकाने थाटली. मंगळवारी दुपारपर्यंत बाजारपेठ भागात नागरिकांची गर्दी उसळली होती.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी मिळेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती; परंतु जिल्हा प्रशासनाने केवळ किराणा आणि भाजी विक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. इतर व्यावसायिकांना दुकान सुरू करण्याची परवानगी नसली तरी मंगळवारी मात्र इतर व्यवसायाची अनेक दुकाने सुरू करण्यात आली. हॉटेल, गॅरेज, झेरॉक्स सेंटर, मोबाईल विक्रीची दुकाने, तसेच इतर व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने सुरू करून व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे, लघु विक्रेत्यांनी बाजारपेठ भागात आपली दुकाने पुन्हा एकदा थाटली. नागरिकांनीही खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. शनिवार आणि रविवार असे दोनच दिवस किराणा, भाजी विक्रीची दुकाने बंद होती; परंतु तरीदेखील मंगळवारी बाजारपेठेत कमालीची गर्दी दिसून आली. दुपारी दोन वाजेपर्यंत ही बाजारपेठ सुरू होती.
जागोजागी वाहतूक ठप्प
मागील अनेक दिवसांनंतर शहरातील बाजारपेठ भागात मोठी वर्दळ पहावयास मिळाली. भाजीपाल्याच्या विक्रीसह इतर किरकोळ वस्तूंची दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेतील रस्ता ठिकठिकाणी वाहतुकीने ठप्प पडल्याचे दिसून आले. अनेक दिवसांनंतर शहरात वाहतुकीच्या समस्येने डोके वर काढले.
सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या
दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने १ जून रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन महानगरपालिकाअंतर्गत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. कोरोनाचे संकट कमी झाले असून, दोन महिन्यांपासून व्यापारपेठ बंद असल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकांचे हप्ते, वीज बिल, जागेचे भाडे, नोकरांचे पगार आदी आर्थिक समस्यांमुळे व्यापारी अडचणीत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता कोरोनाचे कडक निर्बंध लावा; परंतु सर्व दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या हिंगोली, लातूर, जालना या जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातही दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा भाजप महानगर व्यापारी आघाडीच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत डहाळे, मराठवाडा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष नितीन वट्टमवार, दीपक टाक आदींनी दिला आहे.