कोरोना आणि सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना गहू, ज्वारी, चना, तूर आदी माल लाॅकडाऊनमुळे विकता आलेला नाही. हा माल घरी पडून असल्याने त्याचे नुकसान होत आहे. यातच खरीप हंगामाच्या तोंडावर सर्व रासायनिक खतांच्या किमती कंपन्यांनी वाढविल्या आहेत. यात आयपीएल, महाधन, जीएसएफसी या कंपन्यांनी खतांच्या किमती प्रति बॅग ६०० ते ७०० रुपयांनी वाढविल्या आहेत. यामुळे पेरणीसाठी खत मिळेल का नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंगळवारी निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना जुन्या दराने मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यात यावे व वाढलेल्या खताच्या किमती मागे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. याबाबत निर्णय न झाल्यास शिवसेना आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी गंगाप्रसाद आनेराव, पंढरीनाथ धोंडगे, अतुल सरोदे, अर्जुन सामाले यांची उपस्थिती होती.
खतांच्या भाववाढीचा शिवसेनेतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST