परभणी : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे बदली प्रकरण आणि घनसांवगी सभेतील वादग्रस्त भाषणानंतर शिवसेनेकडून तर अंतर्गत गटबाजीने निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याकरिता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून चालू आठवड्यात ‘डॅमेज कंट्रोल’ चा खटाटोप सुरू असल्याचे जिल्ह्यातील राजकारणात दिसून येत आहे. जिल्ह्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेली शिवसेना गेल्या काही दिवसांपासून नकारात्मक दृष्टीने चर्चेत आली आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पदभार घेण्यापूर्वीच झालेल्या बदलीला शिवसेनेचे खासदार बंडू जाधव हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यावर खासदार जाधव यांनी ८ ऑगस्ट रोजी घनसावंगी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात, ‘परभणीचा कलेक्टर बदलायचा होता. मी शिफारस केली. तर राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान उठविलं, जसं काय आम्ही खूप मोठा अपराध केलायं, शेवटी किती दिवस सहन करायचं, किती दिवस शांत बसायचं, असे म्हणून, वेळ आली तर आम्ही कधीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू’, असा राष्ट्रवादीवर आरोप केला होता. यावेळी त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली होती. शिवाय अन्य काही मुद्द्यांवरून त्यांच्या वक्तव्याचा नंतर समता परिषदेने व नाभिक समाजातील काही कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यामुळे शिवनेसेच्या प्रतिमेला या दोन्ही प्रकरणात काही अंशी तडा गेला. या पार्श्वभूमीवर खासदार जाधव यांनी मुंबईत १३ ऑगस्ट रोजी प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांची परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी भेट घेतली. तसे प्रसिद्धीपत्रकही प्रसार माध्यमांना दिले. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी परभणीत शिवसैनिकांचा अचानक शिवसंवाद मेळावा घेण्यात आला. त्यानंतर आता जिल्हाभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा सर्व खटाटोप पक्षाच्या झालेल्या ‘डॅमेज कंट्रोल’ साठी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मनं जुळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठा अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे पूर्वी गंगाखेडचे माजी आमदार मधुसुदन केंद्रे, परभणीचे माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासोबत तीव्र मतभेद होतेच; परंतु जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांना साथ दिल्याने भाजपाच्या आघाडीत असलेले जिल्हाध्यक्ष आमदार दुर्राणी यांनी नाराजीतून भांबळे यांच्यावर टीका सुरू केली. शिवाय भांबळे विरोधकांसोबत जवळीक वाढविली. ही बाब मुंबईपर्यंत पोहोचली. आगामी नगर पालिका, महानगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत या गटबाजीचा फटका पक्षाला बसू शकतो, म्हणून राष्ट्रवादीची १९ ऑगस्ट रोजी मुंबईत माजी आमदार विजय भांबळे वगळता आमदार दुर्राणी, देशमुख आदींच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक घेतली. त्यानंतर बैठकीत पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचे मनभेद मिटल्याचे दाखविणारे छायाचित्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आले. हा सर्व खटाटोप पक्षाच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठीच होता, अशी चर्चा सुरू आहे.