परभणी: पावसाच्या सरींसह दम्याच्या त्रासाने त्रस्त रुग्णांसाठी परभणीतील शहाणे कुटुंब दरवर्षी जणू श्वासांचे रक्षण करणारा देवदूत ठरतो. सव्वाशे वर्षांहून अधिक काळ अविरत चालत आलेल्या या परंपरेला यंदा पुन्हा एकदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पुनःप्राण मिळाला. रविवारी सकाळी ७.१८ वाजता गांधी पार्क येथे १५ ते २० हजार रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषध वितरित करण्यात आले.
शतकाहून अधिक काळाची परंपरा असलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे हे १२५ वे वर्ष असून, कै. किशनराव शहाणे, कै. माधवराव शहाणे आणि कै. लक्ष्मणराव शहाणे यांच्यानंतर आज शहाणे कुटुंबाची चौथी व पाचवी पिढी हा उपक्रम निःस्वार्थपणे चालवित आहे. यंदा औषध वितरणासाठी राधाकिशन शहाणे, प्रकाश शहाणे, धोंडीराज शहाणे, शरद शहाणे, गणेश शहाणे यांच्यासह परिवारातील अनेक सदस्य सक्रिय होते.
मृग नक्षत्र सुरू होताच वाटतया आयुर्वेदिक औषधाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते घरगुती पद्धतीने गूळ, हिंग आणि पारंपरिक आयुर्वेदिक वनस्पतींनी बनवले जाते. यासाठी १०० किलोहीन अधिक गूळ, १ किलो हिंग आणि एक किलो आयुर्वेदिक मिश्रण वापरून औषध तयार करण्यात आले. प्रत्येक रुग्णाला २ ग्रॅम औषध हातावर दिले जाते. औषध सेवनासाठी कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता येते, असे आयोजकांनी स्पष्ट केले. यंदा पंचांगानुसार मृग नक्षत्र ८ जून रोजी असल्याने वाटपही त्यादिवशी करण्यात आले.
संजीवनी समान औषधीविशेष म्हणजे, हे औषध राज्यभरात केवळ परभणीतच वाटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून दरवर्षी हजारो रुग्ण परभणीत दाखल होतात. यावर्षीदेखील राज्यभरातून सुमारे १५ ते १८ हजार रुग्ण शनिवारीच शहरात दाखल झाले होते. औषध वितरणाची सोय गांधी पार्क भागातील अनेक दुकानांत करण्यात आली होती. या भागात कोणतीही अडचण होऊ नये, म्हणून शिस्तबद्ध रांग व स्वच्छ व्यवस्था करण्यात आली. गांधी पार्क मित्र मंडळाच्या वतीने रुग्णांसाठी मोफत चहा व जेवण, तसेच विश्रांतीसाठी अष्टभुजा देवी मंदिरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शहाणे कुटुंबाचा हा उपक्रम सामाजिक सेवा आणि आयुर्वेदाचा संगम घडवणारा ठरतो. पावसाळ्याच्या सुरुवातीस दम्याचा त्रास वाढत असताना ही मोफत औषधी अनेकांसाठी संजीवनी समान ठरत आहे.