परभणी : नवीन बाधित रुग्णांच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, आठवडाभरात ७ हजार ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील एक आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ३ ते १० मे या एक आठवड्यात ५ हजार ८८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ७ हजार ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. संपूर्ण आठवड्यात बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवीन रुग्णांची नोंद होत होती. शिवाय रुग्णांच्या मृत्यूमुळेही नागरिकांत धास्ती निर्माण झाली होती. आतापर्यंतच्या रुग्णवाढीचा दर पाहिला तर एका दिवसातील १४०० रुग्णसंख्या सर्वाधिक ठरली असून, हा जिल्ह्याचा पीक पॉइंट आहे. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असल्याने कोरोना संसर्ग ओसरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सोमवारी नोंद झाले सर्वाधिक कोरोनामुक्त
३ ते १० मे या काळात ७ हजार ६२५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यात १० मे रोजी सर्वाधिक १ हजार २६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्याचप्रमाणे ३ मे रोजी १ हजार २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. या आठ दिवसांच्या काळात चार दिवस कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजारपेक्षा अधिक आहे.
रुग्णांच्या मृत्यूचे सत्र थांबेना
कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही कमी झाले नाही. दररोज रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ३ ते १० मे या आठ दिवसांमध्ये ११८ रुग्णांचा मृत्यू झाला. ४, ६ आणि ७ मे हे तीन दिवस जिल्ह्यासाठी क्लेशकारक ठरले. या तीनही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ६ मे रोजी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. ७ मे रोजी २३, तर ४ मे रोजी २० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
आठवडाभरात कोरोनामुक्त झालेले रुग्ण
०३ मे १२२०
०४ मे ९४३
०५ मे ८०४
०६ मे ६३९
०७ मे ६८४
०८ मे १०३३
०९ मे १०३७
१० मे १२६५