शहर मनपाने शनिवारी सर्व केंद्रांवर लसीकरण होईल व कोव्हिशिल्डचा दुसरा डोस मिळेल, असे प्रसिद्धीपत्रक शुक्रवारी काढले होते. त्यानुसार पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्या अनेकांना लसीकरणाचे एसएमएस मोबाईलवर मागील २ दिवसांत प्राप्त झाले होते. हे एसएमएस आलेले नागरिक शनिवारी बाल विद्यामंदिर, शंकरनगर, खंडोबा बाजार येथील केंद्रांवर सकाळी १० ते १२ च्या दरम्यान आले होते. मात्र, यातील प्रत्येकाला लस नसल्याचे कारण देत दुसऱ्या केंद्रावर जाण्यास सांगितले. सर्वच केंद्रांवर १८ ते ४४ च्या नागरिकांचे लसीकरण शनिवारी सुरू होते. प्रत्येक केंद्राला किमान २०० डोस शनिवारच्या लसीकरणासाठी उपलब्ध करून दिले होते. तरीही ज्येष्ठ नागरिक यांना लस दिली नसल्याचे बाल विद्यामंदिर, खंडोबा बाजार येथील केंद्रावर ११.३० ते १२.३० च्या दरम्यान केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.
जायकवाडीत टोकन संपले
शहरात दररोज सकाळी केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने टोकन वाटप केले जात आहे. शनिवारी सकाळी जायकवाडीचे सर्व टोकन १० वाजेपूर्वी संपले. यानंतर येथे इतर केंद्रांवर लसीकरणाला गेलेले अनेक नागरिक ऑटो करून, तसेच खासगी वाहनाने मोठ्या आशेने लस मिळेल, यासाठी जायकवाडी केंद्रावर आले होते. येथे आल्यावर त्यांना टोकन संपले आणि टोकनप्रमाणे नोंदणी केलेल्यांना लस मिळेल, इतरांना नाही, असे सांगून परत पाठविण्यात आले.
माहिती घेऊन कळवितोे
लसीकरणाच्या झालेल्या प्रकाराबाबत आयुक्त देविदास पवार यांना दुपारी २.३७ वाजता फोन केला. यावेळी त्यांनी महिती घेऊन तुम्हाला कळवितो, असे सांगितले. परत त्यांचा फोन आला नाही.
मला प्राप्त झालेल्या दुसऱ्या डोसच्या एसएमएसप्रमाणे मी शनिवारी सकाळी ११ वाजता बाल विद्यामंदिर येथील केंद्रावर आलो. येथे लस मिळत नसल्याने शहरातील ५ केंद्रांवर खेटे मारले. परंतु, मला शनिवारी लस मिळाली नाही.
- अजय काळे, परभणी.
नागरिकांत नाराजी
शंकरनगर, खंडोबा बाजार यासह अन्य १० केंद्रांवर शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी ७ वाजता जाऊन टोकन घेतले. यानंतर जेवण करून सेंटरला आल्यावर ४५ वर्षांवरील नागरिकांना आज डोस मिळणार नाही, असे नागरिकांना सांगण्यात आले. यामुळे टोकन देताना किंवा प्रेसनोटमध्ये लस कुठे उपलब्ध आहे, हे नमूद करून आधी कळवावे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. झालेल्या प्रकाराबद्दल अनेकांनी मनपाच्या कारभाराबद्दल नाराजी बोलून दाखविली.