परभणी : तक्रारदार यांच्या शेतातील विद्युत मोटारी करिता रोहित्रावर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यासाठी महावितरणच्या पाथरी ग्रामीण शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञाने तीन हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई एसीबी पथकाने मंगळवारी पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण फाटा येथे केली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पाथरी ठाण्यात सुरू आहे. आरोपीताने पंचासमक्ष तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या, असे म्हणून लाचेची मागणी केली व लाच रक्कम स्वीकारली.
ज्ञानोबा नारायणराव पितळे (४२, वरिष्ठ तंत्रज्ञ, उपविभाग कार्यालय, पाथरी) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या झरी कॅनॉलजवळील असलेल्या शेतात विद्युत मोटार करिता रोहित्रावर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यासाठी आरोपी लोकसेवकाने तीन हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे सोमवारी तक्रार दिली. त्या अनुषंगाने मंगळवारी पडताळणी केली असता आरोपीताने पंचासमक्ष तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या, असे म्हणून लाचेची मागणी केली व लाच रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविली. आरोपी लोकसेवक पितळे याने सिमुरगव्हाण फाटा येथील एका चहाच्या दुकानावर मंगळवारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. एसीबी पथकाने लाचेच्या रकमेसह त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पाथरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, अल्ताफ मुलाणी, निलपत्रेवार, शेख जिब्राईल, कल्याण नागरगोजे, नामदेव आदमे, जे.जे.कदम नरवाडे यांनी केली.
घर झडतीमध्ये सहा लाख ९५ हजार आढळलेसापळा कारवाई झाल्यानंतर आरोपीकडे लाच रक्कम ३ हजार आणि त्या व्यतिरिक्त रोख ८ हजार रुपये मिळून आले. आरोपी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. यानंतर पथकाने आरोपीची घर झडती घेतली असता घर झडतीमध्ये सहा लाख ९५ हजार ११० रुपये रोख मिळाले आहेत. याबाबत पुढील तपास एसीबी पथकाकडून केला जात आहे.