सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परभणी तालुक्यामध्ये २२९ रेशन दुकानदार असून, अंत्योदय योजनेंतर्गत ६ हजार ६२१, अन्नसुरक्षा योजनेत २० हजार ९८५ कार्डधारक आहेत. त्याचप्रमाणे, १ हजार १८५ शेतकरी लाभार्थी आहेत. ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांचा या मोहिमेंतर्गत शोध घेतला जाणार आहे. १ ते ३० फेब्रुवारी या काळात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात १४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार कैलास वाघमारे, अव्वल कारकून सतीश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तलाठी मंडळ अधिकारी आणि रेशन दुकानदारांना मोहिमेची माहिती देण्यात आली. रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी शासनाने नमुना अर्ज उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक लाभार्थ्याने हा अर्ज भरून दुकानदारांकडे द्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी केले.