गंगाखेड: गोदावरी नदी परिसरातून वाळूचोरी व वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यातच वाळूच्या चोरीसाठी आता गाढवांचा वापर केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गंगाखेड शहरातील गोदावरी नदीच्या रेल्वे पुलाजवळील परिसरात वाळूची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. गोदावरी नदी रेल्वे पुलाच्या परिसरातून वाळू उपसा करण्यास प्रतिबंद आहे. या परिसरात सध्या गाढवांच्या साह्याने वाळू उपसा होत आहे. पहाटेच्या वेळी व रात्री वाळू उपसा करून ही वाळू विक्री केली जात आहे. वाळूच्या तस्करीमुळे गोदावरी नदीपात्रात खड्डे पडले असून, यातून पर्यावरणास हानी पोहोचत आहे. प्रशासनाकडून गाढवांद्वारे केल्या जाणाऱ्या वाळू तस्करीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
यापूर्वी असे प्रकार तालुक्यातील नदीपात्रात झाले होते. त्यावेळी महसूल प्रशासनाने कारवाई करून गाढवांना धारखेड ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकले होते. मात्र यानंतर पुन्हा छुप्या मार्गाने वाळूचोरीचा प्रकार सुरूच आहे.