समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर

By मारोती जुंबडे | Published: January 5, 2023 01:55 PM2023-01-05T13:55:01+5:302023-01-05T13:56:15+5:30

जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे.

Samruddhi Highway will reduce Nanded-Jalana distance by 47 km; The 12-hour journey to Mumbai is also in half | समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर

समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर

googlenewsNext

- मारोती जुंबडे
परभणी :
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गास जालना ते नांदेड हा महामार्ग जोडला जाणार असल्यामुळे या दोन शहरातील २२६ किलोमीटरचे अंतर ४७ किमीने कमी होऊन १७९.८ किलोमीटर एवढे राहणार आहे. तसेच नांदेड ते मुंबई दरम्यानचा १२ तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे.

परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे.जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे. या जालना- नांदेड द्रुतगती मार्गाच्या १७९ किलोमीटरसाठी तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांमधील ८८ गावांतून संबंधित मार्ग जाणार आहे. विशेष म्हणजे, एक हजार ९४५ गटातून या मार्गाची सिमेंटने बांधणी केली जाणार आहे. यासाठी दाेन हजार २०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, एक हजार ७३७ हेक्टर क्षेत्र हे खासगी जमिनीचे संपादित होणार आहे. त्यासाठी तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून २,२०० कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

यात जालना जिल्ह्यातील २९ गावातून हा मार्ग जाणार असून ६१८ हेक्टर खासगी जमीन संपादित होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४९३ कोटींची अंदाजित रकमेची मागणी नोंदविली आहे. विशेष म्हणजे, या भूसंपादनासाठी मार्च २०२३ पर्यंत २४७ कोटींचा निधी लागणार असल्याचेही यात म्हटले आहे. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील ४७ गावांमधून हा मार्ग जात असून यासाठी ९२२ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ९०७ कोटींची मागणी नोंदविली आहे. मार्च २०२३ पर्यंत ४५३ कोटी रुपयांच्या रकमेची आवश्यकता आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १२ गावातून हा मार्ग जाणारा असून या जिल्ह्यातील १८५ हेक्टर क्षेत्राचे संपादन केले जाणार आहे. त्यासाठी ८०० कोटींची मागणी नोंदवली असून भूसंपादनासाठी मार्चपर्यंत लागणारा पन्नास टक्के म्हणजे ४०० कोटींची मागणी नोंदविले आहे. त्यामुळे लवकरच या मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे.

सर्वाधिक लाभ परभणीला
जालना- नांदेड या द्रुतगती महामार्गाचा सर्वाधिक लाभ परभणी जिल्ह्याला होणार आहे. जिल्ह्यातील ४७ गावांमधून हा महामार्ग ९३.५२ किमीचा आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातून ६६.४६ किमी जाणारा असून २९ गावांना लाभ होणार आहे. तर त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील १९.८२ किलोमीटर अंतराचा असून १२ गावांतून जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक लाभ हा परभणी जिल्ह्याला होणार आहे.

असा असणार महामार्ग
लांबी......१७९.८ किमी
मोठे पूल......०७
रेल्वे ओलांडणी पूल.....०२
इंटरचेंजेस.......०८
अंडरपास.....१८
भूसंपादनाचे क्षेत्र.....२,२०० हेक्टर
प्रकल्पाची किंमत....१४ हजार ५०० कोटी

Web Title: Samruddhi Highway will reduce Nanded-Jalana distance by 47 km; The 12-hour journey to Mumbai is also in half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.