लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात ९० कोटी २० लाख रुपये प्राप्त झाले असून, त्यातील ६३ कोटी ३० लाख रुपये शेतकऱ्यांच्या याद्यांसह बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानही मिळणार आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने खरिपातील पिकांची मोठी हानी झाली होती. या नुकसानापोटी राज्य शासनाने जिरायती आणि बागायती पिकांसाठी मदतीची घोषणा केली. हे अनुदान दोन टप्प्यात वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्धी रक्कम जमा झाली होती. उर्वरित ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने ही रक्कम तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग केली असून, तहसील स्तरावरुन ती शेतकऱ्यांना वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तहसीलदारांनी पात्र शेतकऱ्यांच्या नावासह मदतीची रक्कम बँकांकडे वर्ग केली आहे. आतापर्यंत १ लाख ५१ हजार ५९० शेतकऱ्यांसाठी ६३ कोटी ३० लाख ७७ हजार रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून, लवकरच ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
परभणी, पाथरी तालुक्यात संथगती
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता असल्याने दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाचे वाटप रखडले होते. मात्र, आचारसंहिता शिथील झाल्यानंतर प्रशासनाने या कामाला प्रारंभ केला आहे. इतर तालुक्यांनी बऱ्यापैकी अनुदान बँकांकडे वर्ग केले असले तरी परभणी आणि पाथरी या दोन तालुक्यांमध्ये मात्र हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. परभणी तालुक्यासाठी ५ कोटी ३१ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ ४८० शेतकऱ्यांसाठी ५८ लाख ५३ हजार रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच जिंतूर तालुक्यासाठी १६ कोटी ९८ लाख ९० हजार रुपये प्राप्त झाले असून, येथील तालुका प्रशासनाने २८ हजार ९० शेतकऱ्यांसाठी ९ कोटी २९ लाख ५९ हजार रुपये बँकांकडे वर्ग केले आहेत. तर पाथरी तालुक्याला १४ कोटी २६ लाख १५ हजार रुपये प्राप्त झाले असून, तालुक्यातील २० हजार ७४ शेतकऱ्यांसाठीचे ८ कोटी ८३ लाख ४४ हजार रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. इतर तालुक्यांमध्ये मात्र प्राप्त रकमेपैकी ७० ते ९० टक्के रक्कम बँकांकडे वर्ग झाली आहे.
बँकांकडे वर्ग झालेले अनुदान
परभणी : ५८.५३
सेलू : १००७.३४
जिंतूर : ९२९.५९
पाथरी : ८८३.४४
मानवत : १०७१.७७
सोनपेठ : ८५८.९९
गंगाखेड : ११.०७
पालम : ३४३.०३
पूर्णा : ११६७.०१
एकूण : ६३३०.७७