परभणी : ग्रामीण भागामध्ये स्वच्छता आणि शिक्षणाची लोकचळवळ उभी करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
टाकसाळे यांच्यासह अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या गुड मॉर्निंग पथकाने २५ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे भेट देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापक अनिल सावळे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून यापुढे गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्याच्याकडून शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याचा दाखला घेणार असल्याचे सावळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व गाव विकासात अनिल सावळे यांचा सक्रिय सहभाग असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
डिजिटल शाळा, स्काऊट गाईडचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांतील शिस्त, शालेय स्वच्छता, परिसर स्वच्छता, लोकसहभागातून होत असलेले शाळेचे बांधकाम, प्लास्टिक मुक्तीची मोहीम हे सगळे उपक्रम मुख्याध्यापक अनिल सावळे यांनी राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर ग्रामसेविका मनीषा लोमटे, सीडीपीओ बी. टी. मुंढे, सुपरवायझर एम. एम. भोंग यांनी महिला व कर्मचाऱ्यांच्या मदतीने गाव स्वच्छतेसाठी व प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.
गावच्या विकासासाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील इतर शिक्षक व कर्मचारी मंडळींनीदेखील गाव स्वच्छतेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, गटविकास अधिकारी सुनीता वानखेडे, गटशिक्षण अधिकारी संजय ससाने, विस्तार अधिकारी वसंत कांबळे, तुळशीराम राठोड, वसंत ईखे, सचिन पठाडे, बलभीम मातेले, अशोक गोरे, नरेंद्र कांबळे, स्वच्छ भारत मिशन कक्षातील अधिकारी, कर्मचारी, आशाताई अंगणवाडी ताई आदींची उपस्थिती होती.