छुप्या वीज दर वाढीला ग्राहकांचा विरोध
देवगाव फाटा : कोरोनाच्या काळात महावितरण कंपनीने छुप्या पद्धतीने वीज दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडील थकबाकीची रक्कमही वाढत आहे. वाढीव बिलांना ग्राहकांचा विरोध असून, या संदर्भात महावितरणकडे तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा वीज मीटर रिडींग नुकसारच बिल द्यावे, अशी ग्राहकांची मागणी आहे.
राखेचे दर वाढल्याने व्यावसायिक अडचणीत
देवगाव फाटा : वीट उत्पादनासाठी लागणाऱ्या राखेचे दर मागच्या काही दिवसांपासून वाढले आहेत. त्यामुळे वीट उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. आधीच बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला असताना त्यात राखेचे दर वाढले आहेत. या दरांमध्ये विटांची निर्मिती करणे खर्चिक बाब ठरत आहे.
संचारबंदीत ५ तासांच्या सवलतीची मागणी
देवगाव फाटा : संचारबंदी काळात भाजीपाला, फळे, दुध विक्रीसाठी ५ तासांची सलवत द्यावी, अशी लघु व्यावसायिकांची मागणी आहे. सध्या संचारबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना दररोज आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
वारानुसार रुग्णालयात बेडशीटचे रंग
देवगाव फाटा : सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अंतर रुग्ण विभागात वारानुसार दररोज बेडशीट बदलले जाते. वेगवेगळ्या रंगाच्या बेडशीटचे अनोखे नियोजन रुग्णालयात पहावयास मिळत आहे. उद्धव राऊत हा कर्मचारी ही कामे करतो. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पोखर्णीत मजुरांची टंचाई
पोखर्णी : पोखर्णी व परिसरामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, हळद काएणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असल्याने मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. मजुरांअभावी शेतकऱ्यांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे.
भाजी मंडईत ग्राहकांची जिंतुरात गर्दी
जिंतूर : संचारबंदीच्या काळातही शहरातील येलदरी रस्त्यावरील भाजी मंडईमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे या ग्राहकांमध्ये मास्क न वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. मात्र प्रशासनाचे या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.
खड्ड्यांमुळे वाढला अपघाताचा धोका
जिंतूर : शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा अपघाताचे निमंत्रण ठरत आहे. खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वारांना अपघात झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.