परभणी: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस परभणी येथील विशेष न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरी आणि ८ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
मानवत तालुक्यातील झरी येथील एका ९ वर्षीय मुलीवर जून २०१७ मध्ये गावातीलच एका आरोपीने अत्याचार केला होता. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने मानवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. झरी येथील आरोपी राजाराम किशनराव सत्वधर याने पीडित मुलीस पॉर्न व्हिडिओ दाखवून मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने ही बाब आईला सांगितल्यानंतर या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरुन आरोपी राजाराम किशनराव सत्वधर याच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस उपनिरिक्षक शिवशंकर मनाळे यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण परभणी येथील विशेष जिल्हा न्यायालयात चालविण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.ए.एन. गिराम यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून विशेष न्यायाधीश एस.आय. पठाण यांनी आरोपी राजाराम सत्वधर यास १० वर्षे सक्तमजुरी आणि ८ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडातील ५ हजार रुपये पीडितेस भरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे.